इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने थेट आई-वडिलांनाच संपवलं!
इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना नागपूरमधून उघडकीस आली आहे. शहराच्या कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद करून कारवाईला सुरुवात केली आहे.
नागपूर शहराच्या कपिल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुलानेच जन्मदात्या आईवडिलांची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना मागील वर्षी 26 डिसेंबरला घडली. लीलाधर डाखुळे आणि अरुणा डाखुळे यांची त्यांचा 25 वर्षीय मुलगा उत्कर्ष डाखुळे याने हत्या केली. लीलाधर डाखुळे हे कोराडी थर्मल प्लांटमध्ये टेक्नीशियन होते. तर आई अरुणा डाखुळे प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या.
आरोपी उत्कर्ष डाखुळे हा गेल्या वर्षापासून इंजिनियरिंगचं शिक्षण घेत होता. मात्र त्याचे काही पेपर बॅकलॉग राहिले होते. तो वारंवार नापास होत होता. आई-वडील त्याला दुसरे काहीतरी करण्यासाठी आग्रह करत होते. त्यामुळे तो प्रचंड नाराज होता. या प्रकारातून त्याचे त्याच्या आईवडिलांचे वारंवार वाद व्हायचे.
या सगळ्याचा राग मनात ठेवून त्याने 26 डिसेंबरला त्याने आधी आईचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर वडील घरी आल्यानंतर त्यांना चाकूने मारले. हत्या केल्यानंतर बहिणीला तो कॉलेज मधून घरी न नेता त्याच्या काकांकडे घेऊन गेला व आई बाबा मेडिटेशनसाठी बंगलोरला गेल्याचे त्याने तिला सांगितले. दरम्यान आरोपी उत्कर्ष डाखोळे हा व्यसन करत होता का, याचाही तपास पोलीस करत आहे.
दरम्यान, बुधवारी डाखुळे यांच्या घरातून दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोटच्या पोराने आपल्या आईवडिलांना संपवल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.