संग्रहित छायाचित्र
मुलीशी बोलतो या कारणावरुन वडिल आणि भावांसह तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन लोखंडी रॉड, दगड डोक्यात घालून एका १७ वर्षाच्या युवकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. वाघोलीमधील वाघेश्वर येथे ही घटना घडली.
गणेश वाघु धांडे (वय १७, रा. गोरे वस्ती, वाघेश्वरनगर, वाघोली) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणात गणेश याचे वडील वाघु मारुती धांडे (वय ६४, रा. वाघेश्वरनगर, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन पेटकर (वय ३१), सुधीर पेटकर (वय ३२), लक्ष्मण पेटकर (वय ६०, सर्व रा. वाघेश्वरनगर, गोरे वस्ती, वाघोली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गणेश धांडे हा त्याच्या इतर मित्रासोबत मोटारसायकलवरुन गोरे वस्ती येथील घरी येत होता. गणेश हा आरोपीच्या मुलीसोबत पूर्वी बोलायचा. या गोष्टीचा राग मनात धरून तिघांनी गणेश याला शिवीगाळ केली. तसेच त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी रॉड व दगड डोक्यात मारून गणेश याचा खून केला.
सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे तपास करीत आहेत.