पुणे: ‘रोड रोमिओ’ ने आईसमोरच रस्त्यावर दाखवला मुलीला कोयता!

पुणे: पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेबाबत संवेदनशील असलेल्या शहरातील ठिकाणांची यादी केली असून या ठिकाणी गस्त घालण्यात येत असल्याचे वारंवार सांगण्यात येते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 2 Aug 2024
  • 08:10 am
Koyta Gang, Pune Police, Pune Crime News, Hadapsar, Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

हडपसरमधील घटना, प्रेमसंबंध ठेवले नाही तर वडील, भावाला ठार मारण्याची दिली धमकी, पोलिसांचे नाही राहिले भय

पुणे: पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेबाबत संवेदनशील असलेल्या शहरातील ठिकाणांची यादी केली असून या ठिकाणी गस्त घालण्यात येत असल्याचे वारंवार सांगण्यात येते. विशेषत: शाळा आणि महाविद्यालय परिसरात फिरणाऱ्या ‘रोड रोमियों’चा त्रास वाढल्याने या ठिकाणी दामिनी पथक, स्थानिक पोलीस ठाण्याचे मार्शल, गुन्हे शाखेची गस्त घालण्यात येत असल्याचा दावा केला जातो. मात्र, हा सर्व केवळ एक फार्स असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पोलिसांच्या दाव्यानंतरही शहरात मुली सुरक्षित नसल्याचे चित्र समोर आले आहे. हडपसरमध्ये आईसोबत जात असलेल्या एका मुलीला ‘रोड रोमियो’ने अडवून कोयत्याचा धाक दाखवत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. प्रेमसंबंध न ठेवल्यास वडील आणि भावाला ठार मारण्याची धमकीही त्याने दिली. हडपसरच्या साने गुरुजी हॉस्पिटलसमोर बुधवारी ही घटना घडली.

सुरज उर्फ अजय ज्ञानेश्वर बनसोडे (रा. मांजरी फार्म पोस्ट ऑफिसमागे, मांजरी, हडपसर) या ‘रोड रोमियो’ला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता ७८, १२६ (२), ३५२, ३५१ (१), आर्म ॲक्ट ४ (२५), सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम ८ व १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी १७ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. हडपसर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बनसोडे हा काहीही कामधंदा करीत नाही. पीडित मुलगी तिची आई, वडील, भाऊ यांच्यासमवेत राहते. ही मुलगी राहात असलेल्या इमारतीच्या शेजारच्या इमारतीमध्ये आरोपी राहण्यास आहे. पीडित मुलगी हडपसरच्या एका महाविद्यालयात बारावीमध्ये शिकण्यास आहे. सकाळच्या वेळेत तिचे कॉलेज असते. कॉलेज सुटल्यानंतर ती कॉलेजजवळ असलेल्या एका खासगी शिकवणीमध्ये जाते. ती कॉलेजला बसने जाते. बस थांब्यावरून कॅनालच्या बाजूने मैत्रिणीसह चालत कॉलेजला जाते. कॉलेजला जात असताना आरोपी सुरज हा त्याच्या मोटारसायकलवर बसलेला तिने अनेकदा पाहिलेला होता. काही दिवसानंतर तो तिचा पाठलाग करीत कॉलेजच्या गेटवर येऊन थांबू लागला. बस थांब्याकडे जात असताना आरोपी तिचा पाठलाग करायचा. तसेच अनेकदा एकटी असल्याचे पाहून तिला वाटेत अडवत होता. ‘मला तुझ्याशी बोलायचे आहे’ असे म्हणत थांबवून घेत होता. या मुलीने अनेकदा त्याच्याशी बोलण्याची इच्छा नसल्याचे सांगून पाहिले. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याच्या वागण्याला कंटाळून या मुलीने आईला सर्व प्रकार सांगितला. फिर्यादी मुलीच्या आईने त्याला समजावून सांगितल्यानंतर देखील त्याच्यामध्ये कोणताही फरक पडला नाही.

त्याच्या त्रासामुळे घाबरलेली मुलगी आईला सोबत घेऊन ३१ जुलै २०२४ रोजी सकाळी दहाच्या सुमारास क्लासला निघाली होती. पीडित मुलगी क्लासमध्ये गेल्यानंतर तिची आई बाहेर थांबून तिची वाट पहाट होती. क्लास सुटल्यानंतर पीडित मुलगी आईसह साने गुरुजी हॉस्पिटलसमोरून चालत जात होत्या. त्यावेळी आरोपी सूरज मोटारसायकलवरून आला. त्यावेळी त्याचा एक मित्रदेखील सोबत होता. त्याने या मुलीला कोयता दाखवला. ‘माझ्याशी बोलणार की नाही? नाही तर तुझ्या भावाला व वडिलांना मारून टाकतो’ अशी धमकी त्याने दिली. त्यावेळी पीडित मुलीच्या आईने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तिलाही शिवीगाळ करून ‘तुलाही बघून घेतो’ अशी धमकी त्याने दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, पीडित मुलीने तक्रार देताच तत्काळ गुन्हा दाखल केला. त्याला तत्काळ अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. पीडित मुलीलाही धीर देण्यात आला आहे. मुलींनी घाबरण्याचे कारण नाही. पोलिसांची सर्वत्र गस्त सुरू असते.  कोणी रोडरोमियो त्रास देत असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी. पोलीस नक्की कारवाई करतील असे निरीक्षक पांढरे म्हणाले. 

Share this story

Latest