संग्रहित छायाचित्र
पुणे : सराईत चोरटे चोरी करण्यासाठी विविध प्रकारच्या युक्त्या अवलंबत असतात. वाघोली येथील अँग्रीको एनर्जी रेंटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामामध्ये चोरट्यांनी हात साफ करीत १७ लाख ५१ हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा लंपास केल्या. ही चोरी करण्यासाठी चोरट्यांनी भुयार खोडल्याचे समोर आले आहे. याच भुयारामधून चोरटे गोदामामध्ये शिरले आणि हात साफ करीत पसार झाले.
याप्रकरणी संदीप गुरव (वय ५०) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात गुरव यांची अँग्रीको एनर्जी रेंटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीमध्ये तांब्याच्या तारा, तसेच अन्य इलेक्ट्रीकल्स साहित्याची निर्मिती केली जाते. कंपनीचे आवार चारही बाजूने मोठे पत्रे लावून बंद सुरक्षित करण्यात आले आहे. या चोरट्यांनी मध्यरात्री पत्र्याच्या शेडला लागून असलेल्या भागात माती उकरली. आतमध्ये जाण्यासाठी छोटे भुयार खोदण्यात आले. त्यानंतर, पत्र्याचे नट उचकटून कंपनीत प्रवेश केला. कंपनीतील १७ लाख ५१ हजार रुपयांचे ७३ तांब्याच्या तारांचे बंडल लंपास केले. सहायक पोलीस निरीक्षक अमर कदम तपास करत आहेत.