संग्रहित छायाचित्र
खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी रस्त्यावर कुख्यात गुन्हेगार नंदू नाईकमार्फत चालवल्या जात असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी शुक्रवार रात्री छापा टाकण्यात आला. या ठिकाणी जुगार खेळत असलेल्या ६० जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत एक लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खडक पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर हा जुगार अड्डा सुरू होता. याच परिसरात सुरू असलेल्या आणखी एका जुगार अड्ड्यावरदेखील कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कुख्यात गुन्हेगार नंदू नाईक हा जनसेवा भोजनालयाच्या इमारतीमध्ये जुगार अड्डा चालवीत होता. ही माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर, पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी सापळा लावला. नंदू नाईक याला गुन्हेगारी क्षेत्रात ‘मटका किंग’ या नावाने देखील ओळखले जाते. त्याचे शहरात वेगवेगळ्या भागात जुगार अड्डे आहेत. शुक्रवारी गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी शुक्रवारी रात्री छापा टाकत एक लाख दोन हजारांची रोकड जप्त केली. तसेच, ६० जणांना ताब्यात घेतले. याच जुगार अड्ड्यावर पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात देखील कारवाई करीत काही जणांना अटक केली होती. त्यानंतर पुन्हा नाईकने जुगार अड्डा सुरू केला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, साहाय्यक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.