संग्रहित छायाचित्र
पुणे : लॉ कॉलेज रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांवर हल्ला करून पळून गेलेल्या चंदन चोरटयांपैकी एकाला पकडण्यात आले आहे. या टोळीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ज्यावेळी पोलिसांचा आणि चोरट्यांचा सामना झाला होता त्यावेळी पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात दोन चोरटे जखमी झाल्याची नवी माहिती समोर आली आहे. ही घटना २२ ऑक्टोबर रोजी घडली होती.
आसिफ हरुनखान गोलवाल (वय २४, रा. जंजाळ, जिल्हा परिषद शाळेजवळ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर ) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शाहरुख कादीरखान पठाण, फारुखखान कादीरखान पठाण (रा. जंजाळ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी त्यांचे साथीदार नदीम खान लतीफ खान, फिरोज खान शरीफ खान, नजीम खान सादुखान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडली त्या रात्री पोलीस शिपाई महेश तांबे, गणेश सातव हे दोन कर्मचारी गस्त घालीत होते. लॉ कॉलेज रस्त्यावरील अभिनव महाविद्यालय रस्ता येथे असलेल्या जानकी व्हिला बंगल्याजवळ आरोपी गोलवाल आणि साथीदार अंधारात थांबले होते.
हे चोरटे शिपाई तांबे आणि सातव यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी दोन चोरट्यांकडे चौकशी केली. संशयावरून त्यांना ताब्यात घेत असतानाच या चोरट्यांनी अन्य साथीदारांना बोलावून घेतले. या सर्वांनी मिळून त्यांच्यावर करवतीने हल्ला केला. दरम्यान, पोलीस शिपाई तांबे यांनी स्वसंरक्षणार्थ चोरट्यांच्या पायाच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. हे चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पोलिसांनी तांत्रिक तपासाला सुरुवात केली. हे चोरटे छत्रपती संभाजीनगरचे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. छत्रपती संभाजीनगर परिसरातील जंजाळ गावातून आरोपी गोलवाल याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याने चौकशीमध्ये दोन साथीदार गोळी लागून जखमी झाल्याची माहिती दिली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक कवटीकर, उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले, शुभम देसाई, राहुल मखरे, शिंदे, धनश्री सुपेकर, दरेकर, सोनवणे, साबळे, सागर घाडगे, वसीम सिद्दीकी यांनी ही कारवाई केली.