संग्रहित छायाचित्र
पुणे : विमानात बाँम्ब ठेवल्याचे संदेश सोशल मिडियावर टाकून अफवा पसरविण्याचे प्रकार दिवसागणिक वाढू लागले आहेत. पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर विमानामध्ये बाँम्ब ठेवल्याचा संदेश प्रसारित करून अफवा पसरविल्याप्रकरणी विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदेशात सात विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा संदेश दोन खासगी विमान कंपन्यांना पाठविण्यात आले होते. या संदेशाच्या अनुषंगाने विमानांमध्ये तपासणी करण्यात आली. त्यानंतर हा खोटा संदेश असल्याचे निष्पन्न झाले.
श्रीकांत चंद्रशेखर वडगावकर (वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेलया माहितीनुसार, ॲडम अलांझा १००० या नावाने सोशल मिडियावर एक अकाऊंट आहे. या अकाऊंटवरुन सोशल मिडियावर विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा संदेश प्रसारित करण्यात आला होता. इंडिगो एअरलाइन्सच्या गुरुग्राम येथील अधिकृत सोशल मिडियावर अकाऊंटवर ॲडम अलांझा याने विमानात बॉम्ब ठेवल्याचा मेसेज केला होता.
त्यानंतर पाटणा ते पुणे, बंगळुरु ते पुणे, कोलकात्ता ते पुणे या विमानांची कसून तपासणी करण्यात आली. प्रवाशांना विमानातून खाली उतरविण्यात आले. त्याचा परिणाम विमान सेवेवर झाला. अशाच प्रकारणाचा आणखी एक संदेश ‘२००८ बाँम्बिंग’ या खात्यावरुन पाठविण्यात आला होता. विस्तारा एअरलाइन्स कंपनीच्या सिंगापूर ते पुणे, अकासा एअरलाइन्सच्या कोलकात्ता ते पुणे, इंडिगो एअरलाइन्सच्या पुणे ते जोधपूर, कोलकात्ता ते पुणे या विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले होते.
१५ ऑक्टोबर
इंडिगोच्या तीन विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेसेज एका तरुणाने सोशल मिडिवार टाकला होता. पोलीस, सीआयएसएफ, विमानतळ प्रशासन आणि संबंधित विमान कंपनीने विमानाची तपासणी केल्यानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. बुधवारी मध्यरात्री लखनऊ येथून पुण्याला येत असलेल्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. त्याने सोशल मिडियावर ‘मी विमानात बॉम्ब ठेवला असून, आज खूप लोक संपणार आहेत’ असे लिहिलेले होते. या मेसेजच्या अनुषंगाने पुणे विमानतळावर संबंधित विमान ‘आयसोलेशन बे’ मध्ये उतरविण्यात आले होते. दरम्यान, ‘रेस्क्यू टीम’ने सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली.
२० ऑक्टोबर
‘स्क्रिझोफ्रेनिया १११’ या सोशल मिडियावरील अकाऊंट धारकाने पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावरुन रविवारी (२० ऑक्टोबर) दुपारी सिंगापूरला जात असलेल्या खासगी विमान कंपनीच्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा मेसेज पाठविला होता. विमानतळ प्रशासनाच्यावतीने मुनीष कोतवाल (वय ४३) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांचे बॉम्ब शोधक नाशक पथक आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी विमानतळाची तपासणी केली. तेव्हा विमानात बॉम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. ही अफवा असल्याचे आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
२२ ऑक्टोबर : अकरा विमानात बॉम्ब ठेवल्याचे ट्विट
अकासा एअर कंपनीच्या ११ विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याचे ट्विट करण्यात आले होते. ‘अॅबट लुकासनतुली २२७१’ या ट्विटर हॅन्डल चालकाविरोधात विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारथी सर्वानंद पांडे (वय ३४, रा. दत्तकृपा सोसायटी, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार अकासा एअरलाईन्सच्या गोवा ते पुणे, दिल्ली ते पुणे आणि पुणे ते कोलकाता प्रवासादरम्यान २२ ऑक्टोबर रोजी घडला होता. आरोपीने अकासा एअरलाईन्सच्या ट्विटर हॅण्डलवर ‘दहशतवादी लुकास आणि तुलीप यांनी तुमच्या अकरा फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवला’ असल्याचा मेसेज केला होता.