संग्रहित छायाचित्र
पुणे : खासगी व शासकीय कार्यालयांमध्ये महिला सुरक्षेसाठी ‘पॉश’ कमिटी नेमण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अनेक कार्यालयांमध्ये या कमिटी सक्रिय देखील आहेत. मात्र, अनेकदा या कमिटीकडूनच महिला आत्याचाराची प्रकरणे दडपण्याचे काम केले जात असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. येरवडा येथील एका फायनान्स कंपनीत देखील असाच प्रकार उघडकीस आला आहे. तिचा विनयभंग करण्यात आल्यानंतर याबाबत पॉश कमिटीकडे तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, कमिटीने हे प्रकारण दडपण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकावर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी व्यवस्थापक शुभम दुबे (वय ३४) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम दुबे हा एका प्रसिद्ध फायनान्स कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतो. तर, पिडीत तरुणी फायनान्स कंपनीत काम करते. येरवडा येथील आयटी पार्क परिसरात या कंपनीचे कार्यालय आहे. ही तरुणी ऑफिसमधील प्रसाधनगृहात जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. तिला अडवित अश्लील वर्तन केले. तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्याच्या सांगण्याप्रमाणे न वागल्यास कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली.
या तरुणीने आरोपीच्या मागणीला नकार दिला. त्यानंतर आरोपीने या मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या त्रासाला कंटाळून पिडीत तरुणीने ऑफिसमधील महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रार दिली. मात्र, या समितीने तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही. तसेच, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीने त्यानंतर देखील आरोपीने तिला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून तिने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका देवकर-पाटील आहेत.