संग्रहित छायाचित्र
पुणे: साद मोटर्स नावाने गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू करून या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दर महिला दोन ते तीन टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवत अनेकांना १ कोटी १७ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार २०२० ते २० जुलै २०२४ दरम्यान, कोंढवा येथील मिठानगर भागात असलेल्या निर्मल कॉम्प्लेक्स व कोणार्क इंद्रायू याठिकाणी घडला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रफीक कलंदर शेख (वय ४४), सबनोर ऊर्फ सौदा रफीक खान (वय ४०), इसा रफीक खान (वय २३), अब्दुल रशीद ऊर्फ मिफताही कलंदर खान (वय ४८, रा. ग्रेस रेसीडेन्सी, भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर ४०६, ४२०, ३४ महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण ३, ४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी निसार बाबुलाल शेख (वय ५५, रा. ईताशा सोसायटी, चिंतामणी नगर, हडपसर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे त्यांची पत्नी, मुलगा, सून यांच्यासह राहण्यास आहेत. ते देहूरोड ॲम्युनेशन फॅक्टरी येथे सिव्हील डिफेन्समध्ये नोकरी करतात. तसेच, त्यांचा भाऊ हमीद बाबुलाल शेख हा रिक्षा चालक आहे. आरोपी रफिक, सनोबर ऊर्फ सौदा इसा खान, अब्दुल रशीद यांनी फिर्यादी, त्यांचा भाऊ यांच्यासह समीर रज्जाक शेख, जहाँगीर मेहबुब पठाण, अझीम राजु भाई मुलाणी, संदीप बधे, विशाल चव्हाण, अनिकेत गायकवाड, चालर्स डिक्रूज यांची भेट घेतली होती. त्यांना ‘साद मोटर्स’ या गाडी खरेदी विक्रीचे व्यवसायामध्ये पैसे गुंतवणुक केल्यास प्रती महिन्याला २ ते ३ टक्के दराने परतावा पैसे देतो असे सांगुन त्यांच्याकडून पैसे उकळले. त्यांना परताव्याची रक्कम तसेच मुळ रक्कम परत न देता फसवणूक केली आहे.
रफिक खान याना फिर्यादीचा भाऊ हमीद शेख हे ओळखत होते. साधारण २०२० मध्ये हमीद शेख यांच्या एका घरगुती कार्यक्रमाला सर्वजण जमलेले होते. त्यावेळी तेथे रफिक खान त्याची पत्नी सनोबर ऊर्फ सौदा, मुलगा इसा खान, व भाऊ अब्दुल रशीद हेदेखील आलेले होते. त्यावेळी सर्वांची ओळख झाली. आरोपींनी त्यांना त्यांचे शॉप कोंढवा खुर्द येथे असून तेथे ‘साद मोटर्स’ या नावाने गाडी खरेदी विक्रीचा व्यवसाय चालतो असे सांगितले. तसेच ते जुन्या बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, वॉक्स बॉगन, होन्डाई, टोयाटो, होन्डाई, टोयाटो, होन्डा व स्कोडा इत्यादी प्रिमीअम गाडया खरेदी व विक्री करतात. त्यांचे पुण्यासह महाराष्ट्रात विविध जिल्हयामध्ये कार विक्री कंपनीच्या शोरुम डिलरशी थेट व्यावसायिक संबध असल्याची बतावणी केली होती. त्यांना गाडी विक्री व खरेदीमधून ३० ते ४० टक्के नफा मिळत असल्याची बतावणी केली. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष आरोपींनी दाखवले. त्यानुसार, गुंतवणूकदारांना दरमहा २ ते ३ टक्के दराने परतावा देण्याच्या भुलथापा देण्यात आल्या होत्या.
तसेच रफिक खान याने त्यावेळी मोबाईलमध्ये प्रिमीअम कार तसेच कार खरेदी केलेली बील, विक्रीची बीले यांचे फोटो व त्यांच्या व्यावसायाचे जीएसटी प्रमाणपत्र, उद्यम नोंदणी पत्र, शॉप ॲक्ट लायसन्स अशी कागदपत्र दाखविली. तसेच, अब्दुल रशीद याने त्यांचे मिफताही नावाचे युटूब चॅनल असुन त्यामध्ये ते मुस्लीम धर्माचा प्रसार व धर्माबाबतचे शिक्षण देण्याचे काम करतात, असे सांगितले. तसेच, ते टिकटॉकच्या माध्यमातून मुस्लीम धर्मातील लोकांना जगण्याचा चांगला मार्ग दाखवितात असे सांगितले. त्याने काही व्हीडीओ देखील दाखविले. धर्माचा हवाला देत त्याने ‘तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, तुम्ही आमच्या व्यवसायात पैसे गुंतवल्यास चांगले होईल अशी बतावणी केली. सनोबर ऊर्फ सौदा हिनेदेखील फिर्यादीच्या पत्नीला व्यवसायामध्ये पैसे गुंतविल्यास खुप चांगला परतावा मिळतो. अशी संधी परत येणार नाही, असे विश्वासाने सांगितले. त्यानंतर आरोपींनी त्यांना वारंवार फोन करून साद मोटर्सच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले. व्यवसायाबद्दल माहिती देऊन गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला ३६ लाख रुपये गुंतवले. सुरुवातीला आरोपींनी काही प्रमाणात फिर्यादीच्या पत्नीला परतावा दिला. परंतु, फिर्यादीला परतावा दिला नव्हता. याबाबत विचारणा केली असता काही दिवसातच तुम्हाला परतावा दिला जाईल, असे सांगितले. मात्र, पुन्हा वारंवार मागणी करूनही त्यांना परतावा देण्यात आला नाही.
सप्टेंबर २०२३ नंतर फिर्यादीच्या पत्नीलादेखील परतावा देणे बंद केले. आरोपींनी त्याविषयी किरकोळ आश्वासने देऊन परतावा देऊ असे सांगितले. आरोपींनी वेगवेगळी कारणे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. पोलिसांत तक्रार करतो असे सांगताच दोन महिन्यांची मुदत मागून घेतली. मात्र, आरोपींनी त्यांना परतावा दिला नाही. त्यांच्याप्रमाणे जहांगीर पठाण यांच्याकडून ८ लाख ४४ हजार, अझीम राजुभाई मुलानी यांच्याकडून ११ लाख रुपये, संदीप बधे यांच्याकडून ८ लाख, विशाल चव्हाण यांच्याकडून ४ लाख, अनिकेत गायकवाड यांच्याकडून ३ लाख अशी सर्वांची मिळून १ कोटी १७ लाखांची फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील करीत आहेत.