पुणे: गुन्ह्यात गोवल्याने केला थेट खून; गजाने बेदम मारहाण करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकला

पुणे: गुन्ह्यात गोवल्याच्या रागातून दोघांनी तरुणाला गजाने बेदम मारहाण करून त्याचा खून केला. तरुणाचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर टाकून दिला. रेल्वेगाडीखाली आल्याने मृतदेह छिन्नविछिन्न झाला. हडपसर भागातील रामटेकडी परिसरात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 22 Jul 2024
  • 07:47 am
Pune, Pune News, Pune Crime, Pune City Police

संग्रहित छायाचित्र

खुनानंतर पोलीस ठाण्यात हजेरी लावून दिली कबुली 

पुणे: गुन्ह्यात गोवल्याच्या रागातून दोघांनी तरुणाला गजाने बेदम मारहाण करून त्याचा खून केला. तरुणाचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर टाकून दिला. रेल्वेगाडीखाली आल्याने मृतदेह छिन्नविछिन्न झाला. हडपसर भागातील रामटेकडी परिसरात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. तरुणाचा खून केल्यानंतर आरोपी हडपसर पोलीस ठाण्यात हजर झाले.

फरहान अब्दुल रज्जाक शेख (वय ३३, रा. रामटेकडी, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सिद्धेश्वर दिलीप चव्हाण, भैय्या उर्फ प्रसाद विजय कांबळे (दोघे रा. रामटेकडी, हडपसर) यांना अटक करण्यात आली. आरोपी सिद्धेश्वर चव्हाण सराईत गुन्हेगार आहे. शेख याचा भाऊ फरीद अब्दुल रज्जाक शेख (वय ३०) याने याबाबत फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहान शेख वेल्डिंगचे काम करतो. आरोपी फरहान आणि सिद्धेश्वर ओळखीचे आहेत. वर्षभरापूर्वी सिद्धेश्वरविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात तो कारागृहात होता. फरहानमुळे गुन्हा दाखल झाल्याचा राग सिद्धेश्वरच्या मनात होता. दोन महिन्यांपूर्वी तो कारागृहातून जामीन मिळवून बाहेर आला. त्यावेळी त्याने फरहानला जिवे मारण्याची धमकी दिली होती. फरहानने या घटनेची माहिती भाऊ फरीदला दिली होती.

सिद्धेश्वर आणि त्याचा साथीदार प्रसादने शनिवारी मध्यरात्री फरहानला दारू पिण्यास हडपसर भागातील रामटेकडी परिसरात नेले. त्याला गजाने बेदम मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या फरहानचा मृत्यू झाला. त्यानंतर फरहानचा मृतदेह रेल्वे रुळावर टाकून दोघेजण पसार झाले. रेल्वेगाडी गेल्यानंतर फरहानचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला. आरोपी सिद्धेश्वर आणि साथीदार प्रसाद मध्यरात्री सव्वादाेनच्या सुमारास वानवडी पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

घटना हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने वानवडी पोलिसांनी या घटनेची माहिती हडपसर पोलीस ठाण्यात दिली. फरहानचा भाऊ फरीदला या घटनेची माहिती दिल्यावर फरीदने मृतदेहाची ओळख पटविली. त्यानंतर दोघांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गीते तपास करत आहेत. 

बतावणी:
रामटेकडी परिसरातील रेल्वे रुळाजवळ बाचाबाची झाली. त्यानंतर फरहानला धक्का दिल्याने तो रेल्वेगाडीखाली सापडला, अशी बतावणी आरोपी सिद्धेश्वरने पोलिसांकडे केली. फरहानमुळे खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने त्याचा राग सिद्धेश्वरच्या मनात होता. त्याचा काटा काढण्यासाठी सिद्धेश्वर आणि साथीदाराने त्याला दारू पिण्यासाठी बोलावून घेतले. बेदम मारहाण करून त्याचा खून केला. रेल्वे रुळावर मृतदेह टाकून आरोपी पसार झाले.

Share this story

Latest