संग्रहित छायाचित्र
पुणे: कल्याणीनगर येथे पुन्हा एकदा बेदरकार वाहनचालकामुळे एका शालेय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी घडलेल्या घटनेत दहावीतील विद्यार्थी शाश्वत राम भोंगाडे ( वय १५ वर्षे, रा. कुमार कृती सोसायटी, कल्याणीनगर) हा सायकलने शाळेस जात असता शेजारून जाणाऱ्या मोटारीचा सायकलला धक्का बसल्याने तो खाली पडला. यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच सायकलचे हँडल पोटाला लागल्याने अंतर्गत रक्तस्राव झाला. त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
शाश्वत नेहमीप्रमाणे कल्याणीनगर येथील आपल्या घरातून काही अंतरावर असलेल्या एका खासगी शाळेत जात होता. यावेळी मुळीक रस्त्यावरील मॅरीगोल्ड सोसायटी समोरून जात असताना हुंडाई कंपनीची अल्काजर मोटारीची शाश्वतच्या सायकलला बाजूने धडक बसली. या अपघातात शाश्वत खाली पडला व त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच सायकलचे हँडल त्याच्या पोटाला जोरात लागल्यामुळे शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाला. मोटारचालक रवीकांत रामदिन गौड (वय ३७ वर्षे, रा. रोहन मिथीला, विमाननगर, मूळगाव घोडबंदर, ठाणे ) याने शाश्वतला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, शाश्वतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गौड सकाळी एका सुपर शॉपीमधून खरेदी करून कल्याणीनगरकडून विमाननगरकडे जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. शाश्वतचे वडील राम भोंगाडे आळंदी रस्त्यावरील टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये अभियंता म्हणून नोकरीला आहेत. त्यांना दहा वर्षांचा दुसरा मुलगा आहे. शाश्वतच्या अपघाती मृत्यूने कुमार कृती सोसायटीत शोककळा पसरली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश लामखेडे करीत आहेत.