मौजमजेसाठी चोरल्या दुचाकी; पोलिसांनी केले गजाआड
पुणे : मौजमजेसाठी घरफोडी व स्पोर्ट बाईक चोरणाऱ्या सराईतांना गजाआड करण्यात आले आहे. त्यांच्याकडून घरफोडीचे सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून चोरीच्या ४ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. कोंढवा पोलिसांनी ही कारवाई केली.
समीर उर्फ अल्फाज हनिफभाई शेख (वय १८, रा. सैय्यदनगर, हडपसर), मह्या उर्फ महेश काशिनाथ चव्हाण (वय १९, रा. गाडीतळ, हडपसर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अंमलदार राहुल थोरात, विकास मरगळे, अभिजीत जाधव, गणेश चिंचकर, अक्षय शेडगे यांना खबऱ्याने आरोपींची माहिती दिली होती. त्याअनुषंगाने कारवाई करीत या दोघांना अटक करण्यात आली.
आरोपींनी प्रतिभा हौसिंग सोसायटी, अर्जुन मुक्ताई बिल्डींग, वसंतलता अपार्टमेंट, नताशा हिल व्ह्यू सोसायटी, परफेक्ट मेडिकल शॉप, स्वप्नपुर्ती निवास या सोसायटयांमध्ये घरफोडीचे ६ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्यामधील चोरीला गेलेले सोन्याचे दागिने, रोकड असा एकुण १ लाख ३१ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच, चोरीच्या दोन चार मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींकडून दहा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर, निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख, निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, अंमलदार अमोल हिरवे, अभिजीत जाधव, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, राहुल थोरात, राहुल रासगे, विकास मरगळे, मयुर मोरे, अक्षय शेंडगे यांनी केली आहे.