पिंपरी-चिंचवड: काळेवाडीत वाहनांची तोडफोड सुरूच

मिश्र लोकवस्ती असलेल्या काळेवाडी परिसरात सुरू असलेल्या वाहनांच्या तोडफोडीच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीत. तीन दिवसांत तोडफोडीच्या घटनांत १५ वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे. तसेच याच भागातील वाईन शॉप, ज्वेलर्स शॉपमधून ऐवज चोरी करण्यात आले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 21 Jul 2024
  • 01:48 pm
 vehicle vandalism, pimpri-chinchwad, mixed-populated kalewadi, crime, kalewadi vehicle vandalism, pcmc

संग्रहित छायाचित्र

सलग तीन दिवसांत १५ वाहने फोडली, वाईन शॉप, ज्वेलरी शॉपमधून ऐवज चोरीला

मिश्र लोकवस्ती असलेल्या काळेवाडी परिसरात सुरू असलेल्या वाहनांच्या तोडफोडीच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीत. तीन दिवसांत तोडफोडीच्या घटनांत १५ वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे. तसेच याच भागातील वाईन शॉप, ज्वेलर्स शॉपमधून ऐवज चोरी करण्यात आले आहेत. वाकड पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत असलेल्या काळेवाडी परिसरात सातत्याने हाणामारी, वाहनांची तोडफोड, दुकानांमध्ये चोरीच्या घटना वाढत आहेत.

वाहनांची तोडफोड करून त्याबाबत जाब विचारणाऱ्या व्यक्तीला तिघांनी मिळून लुटले. शिवीगाळ करत पोलिसात तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी निघून गेले. ही घटना बुधवारी (१७ जुलै) पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास नढेनगर, काळेवाडी येथे घडली. अनिकेत विश्वकर्मा आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दिलीप गुलाबराय सबनानी (वय ४२, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सबनानी यांना त्यांच्या घराबाहेर काचा फुटण्याचा आवाज आला. त्यामुळे ते बाहेर गेले. घराबाहेर पार्क केलेल्या त्यांच्या कारची काच फोडल्याचे दिसल्याने त्यांनी आरोपींना माझ्या कारची काच का फोडली, असे विचारले. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ केली. लोखंडी रॉडने मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्या खिशातून ७०० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली.

'मी अनिकेत विश्वकर्मा आहे. मी इथला भाई आहे. मी तुझ्या गाडीची काच फोडली आहे. तुला काय करायचे ते कर. पोलिसात तक्रार केली तर मारून टाकू' अशी धमकी देऊन शिवीगाळ करत आरोपी निघून गेले. कौतिक हॉटेल चौकात पहिल्या दिवशी वाहनांची तोडफोड झाली. त्यानंतर याच परिसरातील नढेनगर भागात वाहनांची तोडफोड करून लूटमार करण्यात आली असून, तिसऱ्या दिवशी गुरुवारी पहाटे ११ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

गुरुवारी पहाटे घडलेल्या घटनेत रोहित बबलू सिंग या आरोपीने त्याच्या चार ते पाच साथीदारांच्या मदतीने या भागातील ११ वाहनांची तोडफोड केली आहे. 'तू आम्हाला ओळखत नाही का, आम्ही इथले भाई आहोत' म्हणत ही तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी रावसाहेब माने यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच कोयत्याच्या धाकाने उबेर चालक असलेल्या माने यांच्या खिशातून दिवसभर कमावलेले १२०० रुपये काढून घेतले.

या घटनेबरोबरच काळेवाडी येथील रोहन वाईन शॉप आणि त्याशेजारी असलेले ममता ज्वेलर्स ही दोन दुकाने फोडण्यात आली. दुकानातून डीव्हीआर मशिन आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. ही घटना बुधवारी (१७ जुलै) पहाटे पावणे चार वाजताच्या सुमारास घडली. हिमांशू प्रदीप करीरा (वय ३६, रा. हिंजवडी) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करीरा यांचे काळेवाडी येथे रोहन वाईन शॉप आहे. त्यांनी मंगळवारी रात्री वाईन शॉप कुलूप लाऊन बंद केले. त्यानंतर बुधवारी पहाटे पावणे चार वाजताच्या सुमारास अनोळखी व्यक्तींनी दुकानाचे चनल गेट आणि मुख्य लोखंडी शटर उचकटून आत प्रवेश केला. वाईन शॉपमधून चोरट्यांनी १० हजार रुपये किमतीचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला. त्यानंतर चोरट्यांनी शेजारी असलेल्या ममता ज्वेलर्स या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातून दोन हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

नाकाबंदी अन् गस्त कागदावरच ?
सलग तीन दिवस एकाच परिसरात वाहनांची तोडफोड होत असताना वाकड पोलिसांनी नाकाबंदी आणि गस्त का घातली नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर दररोज रात्र गस्त घातल्याच्या कागदोपत्री नोंदी आहेत. गस्त घातल्यानंतरदेखील सलग तीन दिवस वाहनांची तोडफोड आणि चोरीच्या घटना घडत असल्याने येथील कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

काळेवाडी पोलीस ठाणे कधी
वाकड पोलीस ठाण्याच्या निर्मितीपूर्वी काळेवाडी मधील काही हा सांगवी पोलिसांच्या अखत्यारित होता. कालांतराने वाकड पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली तेव्हा काळेवाडी आणि आसपासचा भाग वाकड पोलीस ठाण्याला जोडण्यात आला. काळेवाडी हा मिश्र लोकवस्ती असलेला भाग असून, या परिसरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे प्रस्तावित आहे. परंतु, अद्याप काळेवाडी पोलीस ठाण्यास शासनाची मंजुरी मिळालेली नाही. या भागातील वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे स्वतंत्र पोलीस ठाणे आणि अधिकचे मनुष्यबळ देण्याची आवश्यकता आहे.

Share this story

Latest