पिंपरी-चिंचवड: सीबीआय-न्यायालयाच्या नावाने पावणे दोन कोटींचा गंडा

ऑनलाईन गंडा घालण्याच्या पाच घटनांमध्ये १ कोटी ६५ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संग्रहित छायाचित्र

पाच घटनांमध्ये फसवणुकीचे नवे ट्रेण्ड समोर

ऑनलाईन गंडा घालण्याच्या पाच घटनांमध्ये १ कोटी ६५ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फसवणूक झालेले उच्च शिक्षित असून, बड्या कंपन्यांमध्ये नोकरी करीत आहेत. यामध्ये न्यायालय आणि सीबीआयमधून बोलत असल्याचे सांगत, मानवी तस्करीच्या माध्यमातून मनी लॉड्रिंगची रक्कम खात्यावर आल्याचे सांगून, अवघ्या १०० दिवसात १००० टक्के परतावा देण्याच्या आमिषाने आणि शेअर ट्रेडिंगमध्ये अधिकचा नफा देण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्यात आली आहे.

पहिल्या प्रकरणात लखनौ न्यायालय आणि सीबीआयमधून बोलत असल्याचे सांगून विविध गुन्हे दाखल असल्याची भीती घालून अनोळखी व्यक्तींनी एका व्यक्तीकडून १५ लाख ७४ हजार ६८८ रुपये घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १ जुलै रोजी थेरगाव येथे घडली. या प्रकरणी थेरगाव येथील ४३ वर्षीय व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाईल क्रमांकधारक अजय मिश्रा, सीबीआय अधिकारी नाव सांगणारा अनोळखी व्यक्ती, सुरेश कोल्ड वॉटर बँक खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने फिर्यादीस फोन करून तो लखनौ सत्र न्यायालयातून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादीवर रावी इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. या कंपनीची केस आहे. त्यासाठी तुम्हाला कृष्णानगर पोलीस ठाणे, लखनौ येथे यावे लागेल, असे सांगितले. तिथे येणे शक्य नसेल तर टेलिग्राम ॲप डाउनलोड करून त्यावरून आणखी एका अनोळखी व्यक्तीने तो सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे भासवले. फिर्यादीवर मनी लॉड्रिंग आणि अपहरणाचे गुन्हे असून त्यात तुम्हाला अटक करायची आहे. तसेच तुमची मालमत्ता जप्त करायची आहे असे खोटे सांगितले. फिर्यादीस भीती दाखवून अटक आणि इतर कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून एका बँक खात्यावर १५ लाख ७४ हजार ६८८ रुपये घेत त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत मानवी तस्करी प्रकरणातील मनी लॉड्रिंगची रक्कम चुकून तुमच्या बँक खात्यावर आली असल्याचे सांगून एका व्यक्तीकडून १२ लाख ७५ हजार ५६९ रुपये घेत फसवणूक करण्यात आली. ही घटना २३ मे ते २४ जून या कालावधीत मोशी प्राधिकरण येथे घडली. राजीव गुप्ता, दिनेश कुमार नामक दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मोशी प्राधिकरण येथील ३४ वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीशी संपर्क करून मनी लॉड्रिंगची रक्कम तुमच्या बँक खात्यावर आली असल्याचे सांगितले. त्यानंतर टेलिग्रामवर एक ग्रुप बनवून त्यावरून फिर्यादीला फोन करून मानवी तस्करीसाठी पाठवलेली मनी लॉड्रिंगची रक्कम तुमच्या खात्यावर आली असल्याचे सांगितले. फिर्यादीकडून वेगवेगळ्या खात्यांवर एकूण १२ लाख ७५ हजार ५६९ रुपये घेत फिर्यादीची फसवणूक केली.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
तिसऱ्या घटनेत अवघ्या १०० दिवसात १००० टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल ९६ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २ एप्रिल ते ८ मे या कालावधीत पुनावळे येथे घडला. या प्रकरणी ३१ वर्षीय व्यक्तीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पारेख ध्रुव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पारेख ध्रुव याने फिर्यादीला सोशल मिडियावरून संपर्क केला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अवघ्या १०० दिवसात तब्बल १००० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादीकडून ९६ लाख ५७ हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

चौथ्या घटनेत 'तुम्हाला ट्रेडिंगमध्ये नफा झाला आहे, असा खोटा इलेक्ट्रोनिक अभिलेख तयार करून तो काढून घेण्यासाठी महिलेकडून २२ लाख ६५ हजार रुपये घेत महिलेची फसवणूक करण्यात आली. ही घटना १८ एप्रिल ते १३ जून या कालावधीत खेड तालुक्यातील खराबवाडी येथे घडली. या प्रकरणी ३५ वर्षीय महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार meta go rade.com या ट्रेडिंग प्लेटफॉर्मवरील ग्रुप कन्सलटंटच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला सोशल मिडियावरील एका ग्रुपमध्ये जॉईन करून घेतले. फिर्यादी यांच्या पत्नीच्या नावाने सिल्व्हर मेंबरशीप घेण्यास लाऊन त्यांच्या ट्रेडिंग खात्यावर जास्तीत जास्त नफा मिळतो आहे, असे दाखवले. फिर्यादी यांच्या खात्यावर ३६ लाख ८४ हजार २६६ रुपये रक्कम जमा झाली असल्याचा खोटा इलेक्ट्रॉनिक अभिलेख आरोपींनी तयार केला. ती रक्कम काढण्यासाठी फिर्यादीकडून २२ लाख ६५ हजार २३ रुपये घेत त्यांची फसवणूक केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

पाचव्या घटनेत देखील ट्रेडिंगच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तींनी एका महिलेची १८ लाख १२ हजार ४३६ रुपयांची फसवणूक केली. ही घटना २३ मार्च ते २७ मे या कालावधीत सांगवी परिसरात ऑनलाईन माध्यमातून घडली. या प्रकरणी ३२ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाईल क्रमांकधारक आणि बँक खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीस सोशल मिडियावरून संपर्क केला. सोशल मिडियावर ट्रेडिंगची जाहिरात देऊन पैसे गुंतवणूक केल्यास २५ ते ३० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर १८ लाख १२ हजार ४३६ रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest