संग्रहित छायाचित्र
पुण्याचे माजी पोलीस आयुक्त वसंत बाळ मोडक यांच्या पत्नी अनिता मोडक यांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात आरोपी पिटर शुक्ला यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पिटर शुक्ला यांनी जादा परताव्याचे आमिष दाखवून ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अनिता मोडक यांनी केला आहे.
फिर्यादी अनिता मोडक या पुण्याचे माजी पोलीस आयुक्त वसंत बाळ मोडक यांच्या पत्नी आहेत. त्यांनी ऑगस्ट 2023 मध्ये लेखी अर्ज देऊन पिटर शुक्ला यांनी ८० लाख घेऊन फसवणूक केल्याचे म्हटले होते. नोव्हेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२३ या दरम्यान ८० लाख रुपये पिटर शुक्ला यांना गुंतवणुकीसाठी दिल्याचे मोडक यांनी सांगितले आहे. पिटर शुक्ला हे फिर्यादी अनिता मोडक यांच्या जावयाचे मित्र आहेत. पिटर शुक्ला यांच्याशी अनिता यांच्याशी छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर येथे ओळख झाली. त्यानंतर पिटर शुक्ला यांनी त्यांना शेयर मार्केट तसेच सॉफ्टवेअर मध्ये गुंतवणूक करून जास्तीचा परतावा मिळवून देण्याचे तसेच महिन्याला खर्चाला पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनंतर तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमधून अनिता मोडक यांनी पिटर शुक्ला यांना ८० लाख रुपयांची रक्कम दिली. तसेच अनिता मोडक यांना डेहराडून येथील अंतरा सीनियर सिटीजन होम मध्ये राहण्यास जायचे होते. त्यासाठी त्यांनी पिटर शुक्ला यांच्याकडून पैशांची मागणी केली. त्यानंतर शुक्ला यांनी तीन चेक दिले. मात्र त्यांच्या खात्यात पैसे नसल्याने ते वटले नाही. तसेच तुमचे पैसे परत देता येणार नाही, तसेच सारखे पैसे मागितले तर तुमच्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास मला काही सांगू नका असे बोलून धमकी दिल्याचा आणि आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला.
फिर्यादींनी दिलेल्या तक्रार अर्जानंतर पिटर शुक्ला यांना गुन्हे शाखेमध्ये वारंवार बोलावले गेले. तसेच पैसे द्या अन्यथा गुन्हा दाखल होईल अशी ताकीद देण्यात आली. त्यावेळी ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी खोट्या गुन्ह्यात अटक टाळण्याची भीती ओळखून सत्र न्यायाधीश एस बी हेडाऊ यांचासमोर पिटर शुक्ला यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या अर्जात हा व्यवहार आपापसातील देवाणघेवाण असून घेतलेली रक्कम मुदतपूर्व देता येणार नाही असा करारनामा दोघांमध्ये झाला आहे. तसेच काही अडचण आल्यास लवादाकडे जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र केवळ तात्काळ पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी पोलिसांचा उपयोग केला गेल्याचा आरोप ॲड. ठोंबरे यांनी केला होता. त्यावेळी तत्कालीन न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी पिटर शुक्ला यांना अंतरिम जामीन दिला होता.
त्यानंतर तब्बल एका वर्षानंतर मूळ अर्ज सुनावणीसाठी आला. केवळ पैशांच्या वसुलीसाठी पोलीस यंत्रणेचा वापर करता येणार नाही. शुक्ला यांनी अनिता मोडक यांना धनादेश देखील दिले आहेत. मात्र तात्काळ पैसे वसूलीसाठी बनावट गुन्हा दाखल करून शुक्ला त्रास देत असल्याचा युक्तिवाद ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांचा युक्तिवाद मान्य केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एम. मुधोळकर यांनी पिटर शुक्ला यांना तपासात सहकार्य करण्याच्या तसेच साक्षीदारांवर दबाव न आणण्याच्या अटीवर कायमस्वरूपी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
यावेळी ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड. विष्णु होगे, ॲड. दिग्विजय ठोंबरे व ॲड. अरविंद सिंह यांनी सहाय्य केले.