संग्रहित छायाचित्र
कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानवर (Hindmata Pratishthan) समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धंगेकरांकडून दिवाळीनिमित्त साबण, उटणे वाटप करण्यात येत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. या वस्तू असलेला टेम्पो भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पकडला. त्यानंतर, सर्वांनी समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेत कारवाईची मागणी केली. त्यानंतर, रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कसबा पेठ मतदारसंघातील नागरिकांना काही पिशव्यांचे वाटप केले जात होते. यामध्ये सुगंधी उटणे, उदबत्ती, रांगोळी अशा वस्तू होत्या. या पिशवीवर धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांच्यासह त्यांच्या पत्नीचे छायाचित्र छापण्यात आलेले होते. या प्रकाराने मतदारांना प्रलोभन दाखविण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे.
दरवर्षी माझा मित्र परिवार आनंदाची दिवाळी भेट देत असतो. अनेक वर्ष हा उपक्रम राबविला जातो. आचारसंहिता लागू केल्यानंतर कुठल्याही प्रकारचे प्रलोभन किंवा वस्तूंचे वाटप करण्यावर बंधन आहे, याची जाणीव मला आहे. या उपक्रमात माझा व्यक्तिश: सहभाग नाही. मला अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे हा आचारसंहिता भंगाचा गुन्हा आहे हे तपासावे लागेल.
- रवींद्र धंगेकर, आमदार कसबा