संग्रहित छायाचित्र
एका सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने सोसायटीत खेळत असलेल्या एका ९ वर्षीय अल्पवयीन मुलाला जवळ बोलावत त्याच्याशी अश्लील कृत्य केले. ही घटना कात्रज परिसरात रविवारी घडली. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलाच्या आईने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. नागराज असे सुरक्षारक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा सोसायटीच्या आवारात खेळत होता. आरोपी नागराज याने या मुलाला जवळ बोलावले. त्याला अश्लील पद्धतीने स्पर्श केला. अश्लील कृत्य केल्याने घाबरलेला हा मुलगा घरी पळत गेला. त्याने याबाबत आईला माहिती दिली. पीडित मुलाला घेऊन आईने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती देत या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच लष्कर भागातील एका शाळकरी मुलावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी एका शाळकरी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोंढवा भागातील एका शाळकरी मुलावर सोसायटीच्या आवारात अल्पवयीनांनी अत्याचार केल्याची घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली होती. अल्पवयीनांवर अत्याचाराच्या घटना शहरात वाढीस लागल्या आहेत. गेल्या दहा महिन्यात अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणात साडेतीनशेहून जास्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहर, उपनगरातील पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे दररोज किमान एक ते दोन गुन्हे दाखल होत असल्याचे समोर आले आहे.