संग्रहित छायाचित्र
विमानात बॉम्ब ठेवल्याचा मेसेज रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलिसांची व सुरक्षायंत्रणांची तारांबळ उडाली. यानंतर सुरक्षेचे उपाय म्हणून विमानतळ प्रशासन, तसेच बॉम्ब शोधक पथकाने विमानाची तपासणी केली. मात्र, तपासणीदरम्यान विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तपासणी दरम्यान हा मेसेज म्हणजे एक अफवा असल्याचे समोर आले. हा मेसेज सोशल मीडियावर पसरविणाऱ्या तरुणाविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर त्याने स्क्रिझोफ्रेनिया १११ असे बनावट नाव धारण केलेले आहे. या प्रकरणी विमानतळ प्रशासनाकडून मुनीष कोतवाल (वय ४३) यांनी फिर्याद दिली आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रविवारी (२० ऑक्टोबर) दुपारी सिंगापूरला एक विमान निघाले होते. या विमानात बाॅम्ब ठेवल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा मेसेज विमानतळ प्रशासनाच्या पाहण्यात आला. त्यानंतर तातडीने या घटनेची दखल घेत माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांच्या बाॅम्बशोधक पथकाच्या तपासणी दरम्यान विमानात बाॅम्बसदृश वस्तू आढळून आली नाही.