संग्रहित छायाचित्र
शहरात चंदन चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. पोलिसांना चंदन चोरट्यांवर नियंत्रण घालण्यास अपयश आले आहे. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता परिसरातील एका बंगल्यात शिरलेल्या बंगला मालकाला दगडाने मारण्याची धमकी देत चंदनाचे झाड कापून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. चंदनचोरीसाठी थेट नागरिकांना मारण्याची धमकी दिली जाण्याच्या प्रकारामुळे भीतीचे वातावरण पसरले त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकरणी आर्यन शिरोळे (वय २३) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारे दोन महिन्यांपूर्वी प्रभात रस्त्यावरील एका बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी वकील महिलेला शस्त्राचा धाक दाखवून चंदन चोरी केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता दगडाने मारण्याची धमकी देत चंदन चोरी करण्यात आली आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयासमोर असलेल्या शिरोळे रस्त्यावर शिरोळे यांचा शिवराई बंगला आहे. २ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांना बंगल्यातील चंदनाचे झाड कापण्याचा आवाज आला. त्यानंतर ते बंगल्याच्या आवारात आले. तेव्हा तीन ते चार चोरटे चंदनाचे झाड करवतीने कापत होते. त्यांनी आरडाओरडा केला. तेव्हा चोरट्यांनी त्यांना दगड भिरकावून मारण्याची धमकी देऊन आरडाओरडा करू नका, असे सांगितले. आरडाओरडा केल्यास दगड मारेल, असे सांगितले. त्यानंतर चंदनाचे झाड कापून चोरटे अंधारात पसार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले या प्रकरणाचा तपास करत आहेत.
गेल्या आठवड्यात लॉ कॉलेज महाविद्यालय रस्त्यावरील एका सोसायटीत शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली होती. शहरातील सोसायटी, शासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्थांच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुकुंदनगर, मार्केट यार्ड, प्रभात रस्त्यावरील सोसायटीत शिरून चोरट्यांनी चंदनाची झाडे कापून नेली होती. चोरट्यांनी वकील महिलेला शस्त्राचा धाक दाखवून चंदनाचे झाड कापून नेले. खडकीतील दारुगोळा कारखान्याच्या आवारातून चंदनाचे झाड कापून नेण्यात आले. चंदन चोरीच्या घटना वाढत असून, चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.