संग्रहित छायाचित्र
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) वैद्यकीय महाविद्यालयात एका प्राध्यापकानेच शिकाऊ महिला डॉक्टरासमोर अश्लिल शेरेबाजी, तसेच गैरवर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. या प्रकरणात विशाखा समितीच्या अहवालानंतर अखेर संबधित प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. तसेच, प्राध्यापकाची खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.
डॉ. बालाजी धायगुडे, असे सेवानिलंबित केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. वायसीएम रुग्णालयामध्ये पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. तेथे शिकाऊ महिला डॉक्टरांसोबत प्राध्यापक व विभागप्रमुख असलेल्या एका वरिष्ठ डॉक्टरने गैरवर्तन केल्याची बाब सोशल मिडियावरील एका पोस्टवरून पुढे आली होती. या प्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर तातडीने डॉ. धायगुडे यांच्याकडील कामकाज काढण्यात आले. तसेच, मध्यवर्ती महिला तक्रार निवारण (विशाखा) समितीला चौकशीचे आदेश देण्यात आले होते. चौकशी करताना विशाखा समितीने आजी व माजी विद्यार्थीनीने पीजी इन्स्टिट्यूट यांनी दिलेल्या प्रत्यक्ष जबाब नोंदवले. डॉ. धायगुडे पदाचा गैरवापर करुन भितीदायक वातावरण, असभ्य, अर्वाच्य, लजास्स्पद, अपमानास्पद, शारीरिक ठेवणीबाबत आक्षेपास टिप्पणी करणे, दारु पिण्यास व डान्स करण्यास सक्ती करणे, महिलांच्या शरीराकडे लज्जा उत्पन्न होईल असे बघणे अशा प्रकारचे गैरवर्तणुक करत होते. यावरून त्यांचा विकृत स्वरुपाचा दृष्टीकोन असल्याचे विशाखा समितीने अहवालात नमूद केलेले आहे.
समितीने शिकाऊ महिला डॉक्टरांनी केलेल्या तक्रारींमध्ये तथ्थ असल्याचा निष्कर्ष आपल्या अहवालात मांडला. यासह समितीने संबधिताविरुध्द कठोर कारवाई करण्याची शिफारस केली. त्यानुसार आयुक्त शेखर सिंह यांनी या प्रकरणात गंभीर गैरवर्तन, कार्यालयीन शिस्त व नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवत प्राध्यापक डॉ. धायगुडे यांचे सेवानिलंबन खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.