‘आर्कलाईन लॉजिस्टीक्स अँड वेअरहाऊस’मधून शेकडो लॅपटॉप लंपास करणारे गजाआड
वाघोली येथील ‘आर्कलाईन लॉजिस्टिक्स अँड वेअरहाऊस’ या गोदामामधून एक कोटी नऊ लाख रुपयांचे तब्बल २८० लॅपटॉप चोरणाऱ्या कामगारासह साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी अवघ्या तीनच दिवसांत हा गुन्हा उघडकीस आणला. आरोपीने हेल्परच्या मदतीने ही चोरी केली होती. याप्रकरणी सुरेश महादेव कुमार (वय ३५, रा. उबाळेनगर, वाघोली, मूळ रा. सहजपूर, उत्तर प्रदेश), शिवाजी जगन्नाथ वसू (वय २७, रा. धानेगाव ता. गंगापूर, जि. संभाजीनगर), कुमुद रंजन झा (वय ३२, रा. प्रियंकानगर, वाघोली) यांना अटक करण्यात आली आहे.
‘अर्कलाईन वेअरहाऊस’मधून लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी घडली होती. या प्रकरणी व्यवस्थापक बाळकृष्ण सखाराम राऊत (वय ३८, रा. केसनंद, हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्कलाईन लॉजिस्टिक्स अँड वेअरहाऊस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वाघोलीतील उबाळेनगर परिसरात आहे. या ठिकाणावरून शहरातील विविध दुकाने, शोरूम आणि वितरकांना ही उत्पादने विक्रीसाठी पाठविली जातात. सुरेश कुमार हा या कंपनीत दोन महिन्यांपासून कामावर येत होता. कमी पगार असल्याने कुमार याने ११ ऑक्टोबर रोजी काम सोडले होते. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी चोरी झाली होती. त्यामुळे या चोरीमागे सुरेशकुमारवर संशय व्यक्त करण्यात आला होता.
तपास चालू असताना पोलीस अंमलदार अजित फरांदे यांनी तांत्रिक विश्लेषण सुरू केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांना खबऱ्यामार्फत आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार, एक पथक छत्रपती संभाजीनगर येथील वाळुंज एमआयडीसीमध्ये पाठवण्यात आले. या पथकाने तिघाजणांना ताब्यात घेतले. सुरेश कुमार याने त्याचा साथीदार तेजप्रकाश याच्या मदतीने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या तिघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषणाची साखळी जोडून पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून ९ लोकांकडून लेनोवो कंपनीचे २४४ लॅपटॉप, २ पिकअप व्हॅन व ३ मोबाईल असा १ कोटी १ लाख २५ हजार रुपयांचा माल हस्तगत केला. न्यायालयाने तिघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटके अधिक तपास करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, साहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, साहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, योगेश खटके, लोणीकंद पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार अजित फरांदे, स्वप्नील जाधव, अमोल ढोणे, वाघोली पोलीस ठाण्याकडील हवालदार संदीप तिकोणे, पोलीस अंमलदार विशाल गायकवाड, बाळासाहेब हराळ, सागर कडू, गणेश आव्हाळे, दीपक कोकरे, प्रीतम वाघ, गहिनीनाथ बोयणे यांनी केली.