पिंपरी-चिंचवड: सासरच्यांकडून जावयाचा खून

युवकाने प्रेयसीला पळवून नेत सहा महिन्यांपूर्वी आंतरधर्मीय विवाह  केला. मात्र, मुलीच्या घरच्यांना हा विवाह मान्य नसल्याने आणि आपली मुलगी पळवून नेल्याचा रागातून तरुणीच्या घरच्यांनी जावयाचा डोक्यात दगड घालून खून केला. एवढेच नाही तर जावयाचा मृतदेह जंगलात लपवून ठेवला.

संग्रहित छायाचित्र

युवकाने प्रेयसीला पळवून नेत सहा महिन्यांपूर्वी आंतरधर्मीय विवाह  केला. मात्र, मुलीच्या घरच्यांना हा विवाह मान्य नसल्याने आणि आपली मुलगी पळवून नेल्याचा रागातून तरुणीच्या घरच्यांनी जावयाचा डोक्यात दगड घालून खून केला. एवढेच नाही तर जावयाचा मृतदेह जंगलात लपवून ठेवला. त्यानंतर डिझेल टाकून मृतदेह जाळला आणि मृतदेहाची हाडे आणि राख पोत्यात भरून नदीत टाकून दिली. पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या या धक्कादायक प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

अमीर मोहम्मद शेख (वय २५, रा. आदर्शनगर, मोशी. मूळगाव अहमदनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मयत आमिरचे वडील मोहम्मद कासिम शेख (वय ५०) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आमिर याच्या पत्नीचा भाऊ सुशांत गोपाळा गायकवाड (वय २२, रा.  रांधे ता. पारनेर), बहिणीचा नवरा पंकज विश्वनाथ पाईकराव ( वय २८, रा. मार्तंड नगर,  चाकण) आणि चुलत भाऊ गणेश दिनेश गायकवाड (वय २२, रा. रांधे ता. पारनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सुशांत आणि पंकज या आरोपींना अटक केली आहे. आमिर याला जाळण्यासाठी डिझेल उपलब्ध करून दिल्या प्रकरणी सुनील किसन चक्रनारायण (वय ३३, रा. चाकण) यालाही अटक करण्यात आली आहे.

आमिर शेख आणि निकिता गायकवाड यांनी सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला. या विवाहाला निकिताच्या घरच्यांचा विरोध होता. निकिता आणि आमिर हे मोशी येथे राहत असून आमिर एका कंपनीत कामाला जात होता. १५ जून रोजी आमिर कंपनीत कामाला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र, तो पुन्हा घरीच न आल्याने निकिता उर्फ अरीना आमिर शेख हीने १६ जून रोजी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, मुलगा घरी न आल्याने वडील मोहम्मद शेख यांना निकिता हिच्या घरच्यांवर संशय आला. त्यांनी २७ जून रोजी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन आमच्या मुलाला यांनी काहीतरी केले असल्याची फिर्याद दिली. 

आंतरधर्मीय विवाहासाठी मुलीला पळवून नेल्याचा राग मुलीच्या घरच्यांना होता. या रागातून निकिता हिच्या दोन भावांनी आणि बहिणीच्या नवऱ्याने आमिर शेख याचा खून केला. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
- गणेश जामदार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी एमआयडीसी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest