पिंपरी-चिंचवड: सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणी माजी नगरसेवकास पोलिसांनी घेतले ताब्यात; नऊ जणांवर गुन्हा दाखल

पुनावळे येथे सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांना रावेत पोलिसांनी ताब्यात घेतले असून, नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Punavale, NCP, Shekhar Owhal

संग्रहित छायाचित्र

पुनावळे येथे सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि सध्या भाजपामध्ये प्रवेश केलेले शेखर ओव्हाळ यांना रावेत पोलिसांनी ताब्यात घेतले असून, नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (१ जुलै) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास पुनावळे येथील समाधान हॉटेलच्या पाठीमागील बाजूस सराईतावर खुनी हल्ला झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले (वय ३४, रा. पुनावळे गावठाण) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अमोल याचा भाऊ समीर उर्फ गोट्या गजानन गोरगले (वय ३२, रा. पुनावळे गावठाण) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेखर अशोक ओव्हाळ, मुन्ना उर्फ अभिषेक बाळासाहेब ओव्हाळ, रितेश रमेश ओव्हाळ (तिघे रा. पुनावळे), समीर शेख, महेश कदम, गणेश कदम, इतर तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२३ मध्ये चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये शेखर ओव्हाळ आणि अमोल गोरगले यांच्यात वाद झाला होता. त्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी अमोल याच्यावर मोठ्या कोयत्याने डोक्यात, पाठीवर वार केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अमोल याला थेरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अमोल याचा मृत्यू झाला. 

शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट
अमोल याने शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट वर्षभरापूर्वी रचला होता. तेव्हा वेळीच याची माहिती मिळाल्याने हा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले होते. कट रचल्याप्रकरणी अमोल हा तुरुंगात होता. तो मागील काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याच्यावर काल हल्ला झाला. अमोलच्या भावाने फिर्याद दिल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांना ताब्यात घेतले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest