पुणे : एक कोटीच्या थकबाकीदाराविरोधात गुन्हा दाखल; राज्यकर विभागाने केली कारवाई

महाराष्ट्र मूल्यवर्धित कायदा २००२ च्या अंतर्गत भरावयाच्या कराची थकबाकी प्रलंबित ठेवत ही थकबाकी भरण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी राज्यकर विभागाने एका कंपनीच्या मालकावर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 State Revenue Department

संग्रहित छायाचित्र

पुणे : महाराष्ट्र मूल्यवर्धित कायदा २००२ च्या अंतर्गत भरावयाच्या कराची थकबाकी प्रलंबित ठेवत ही थकबाकी भरण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी राज्यकर विभागाने एका कंपनीच्या मालकावर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र मूल्यवर्धित कायदा २००२ अंतर्गत कलम ७४(२),७४(३) अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शर्मा सेल्स कॉर्पोरेशन असे या कंपनीचे नाव असून या कंपनीने तब्बल १ कोटी ३ लाख ४२ हजार ८४४ रूपयांचा कर बुडविल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ( State Revenue Department)

भवरलाल मोहनलाल शर्मा (रा. मालविका हौसिंग सोसायटी, एरंडवणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राज्यकर निरीक्षक अरूण दत्तात्रय मुरूमकर यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अरूण दत्तात्रय मुरूमकर हे येरवडा येथील वस्तू व सेवा कर भवन येथे राज्यकर निरीक्षक म्हणून पदावर आहेत. कोणत्याही व्यापाऱ्याने कोणतीही मालाची विक्री केली असता त्या व्यापाऱ्याने कराची रक्कम वसूल करून ती शासनाच्या तिजोरीमध्ये जमा करायची असते. मे. शर्मा सेल्स कॉर्पोरेशन ही कंपनी खाद्य तेलाचा विक्रेता म्हणून व्यवसाय करीत होती. ही कंपनी ४०८ ए, मार्केट यार्ड येथे कार्यरत होती. या कंपनीचे मालक असलेल्या भवरलाल शर्मा यांनी विक्रीकराची रक्कम थकवलेली होती. ही विक्रीकराची थकबाकी भरण्याकरिता त्यांना राज्यकर विभागाने वारंवार सूचित केले होते. या वसुलीसंबधी त्यांना विभागाकडून कायद्यान्वये कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आलेली होती. या नोटीसला शर्मा यांनी आवश्यक प्रतिसाद दिला नाही. तब्बल १ कोटी ३ लाख ४२ हजार ८४४ रूपयांच्या कराची चुकवेगीरी त्यांनी केली. 

त्यामुळे कंपनीच्या मालकावर महाराष्ट्र मूल्यवर्धित कायदा २००२ अंतर्गत कलम ७४(२),७४(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अतिरिक्त राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली व राज्यकर उपायुक्त दिलीप पवार, राज्यकर निरीक्षक अरूण मुरूमकर, कर सहाय्यक जितेंद्र जगताप यांनी केली. याप्रकरणाचा पुढील तपास मार्केटयार्ड पोलीस करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest