पुणे: घरफोड्यांचे सत्र सुरू; चार ठिकाणांवरून सहा लाखांचा ऐवज लांबवला

पालखी बंदोबस्तात पोलीस व्यस्त असल्याचा गैरफायदा उचलत चोरट्यांनी शहराच्या विविध भागात घरे फोडून हात साफ केला. चार ठिकाणी घरफोड्या करीत सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी विश्रांतवाडी, विमानतळ आणि बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 3 Jul 2024
  • 02:52 pm
Pune Crime News, Bibwewadi Police Station, Burglary, Vishrantwadi, Pune Airport, Bibwewadi

संग्रहित छायाचित्र

पुणे: पालखी बंदोबस्तात पोलीस व्यस्त असल्याचा गैरफायदा उचलत चोरट्यांनी शहराच्या विविध भागात घरे फोडून हात साफ केला. चार ठिकाणी घरफोड्या करीत सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी विश्रांतवाडी, विमानतळ आणि बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बिबवेवाडी पोलीस ठाण्यात स्वाती गणेश शिंदे (वय २६, रा. जागडेनगर, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. शिंदे या त्यांच्या राहत्या बंगल्याला कुलूप लावून सोमवारी (दि. १) दुपारी बाहेर गेल्या होत्या. यावेळी आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचे कुलूप तोडले. बेडरूममधील कपाट उचकटून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा दोन लाख ३२ हजारांचा ऐवज लंपास केला. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अतुल विलास शेंडकर यांच्या बंगल्याचेदेखील कुलूप तोडण्यात आले. त्यांच्या घरातील कपाटातून तीन हजारांची रोकड चोरटयांनी लांबवली.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात एका महिलेने फिर्याद दाखल केली आहे. ही महिला धानोरी परिसरात राहण्यास आहे. ही महिला नातेवाईकांकडे बेळगावला गेली होती. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत दागिने आणि रोकड असा दोन लाख ११ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. धानोरी भागातच असलेल्या एका दवाखान्याचा दरवाजा उचकटण्यात आला. दुकानामधील ३० हजार किमतीचा लॅपटॉप लंपास करण्यात आला. याप्रकरणी डॉ. निखिल अशोक भालेराव (वय ३६, रा. लोहगाव) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगाव भागातील जेके पार्क सोसायटीत ही महिला राहण्यास आहे. त्यांच्या सदनिकेचे कुलूप तोडण्यात आले. चोरट्यांनी कपाटातील ९० हजारांची रोकड, तसेच दागिने असा दोन लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलीस कर्मचारी यू. आर. झेंडे याचा तपास करीत आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest