पिंपरी-चिंचवड: कोलकाता येथील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; कॉलगर्लच्या नावाने मागायचे ऑनलाईन खंडणी

गुगलवर कॉलगर्लच्या नावाने खोटे मोबाईल क्रमांक अपलोड करून ऑनलाईन खंडणी मागणार्‍या कोलकाता येथील टोळीचा गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पर्दाफाश केला. कॉल सेंटरवर छापा टाकून ते चालवणार्‍या सहा जणांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून ४ लाख ८४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कोलकाता येथील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; कॉलगर्लच्या नावाने मागायचे ऑनलाईन खंडणी

१५ मोबाईल, ७ व्हाईसचेंज मोबाईल, ४० सिमकार्ड जप्त; ६ आरोपी अटकेत

पिंपरी-चिंचवड: गुगलवर कॉलगर्लच्या नावाने खोटे मोबाईल क्रमांक अपलोड करून ऑनलाईन खंडणी मागणार्‍या कोलकाता येथील टोळीचा गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पर्दाफाश केला. कॉल सेंटरवर छापा टाकून ते चालवणार्‍या सहा जणांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून ४ लाख ८४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Kolkata Call Center)

सुरजकुमार जगदिश सिंग (वय २७), नवीनकुमार महेश राम (वय २३), सागर महेंद्र राम (वय २३), मुरली हिरालाल केवट (वय २४), अमरकुमार राजेंद्र राम (वय १९), घिरनकुमार राजकुमार पांडे (वय २५, सर्व रा. दुर्गाबती कॉलनी, डायमंड प्लाझाजवळ कोलकाता, पश्चिम बंगाल, मूळ - झारखंड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १५ स्मार्ट मोबाईल, ७ व्हाईसचेंज मोबाईल्स, ४० सिमकार्ड, १४ पेमेंट डेबिट कार्ड, ८ आधार कार्ड, पॅनकार्ड, ८ नोटबुक असा ४ लाख ८४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१५ मे रोजी किरण नामदेव दातिर (वय ३५, रा. डुडूळगाव) यांनी ऑनलाईन पैसे मागितल्याचे कारणावरून राहते घरी हॉलमध्ये पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांचा मावस भाऊ सौरभ शरद विरकर (वय २६) यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्याद दिली होती. आरोपी सुरजकुमार व त्याच्या साथीदारांनी मृत किरण यांच्या मोबाईलवर संपर्क करून त्यांचा व्हॉटसअ‍ॅपचा डीपी काढून त्यांच्या फोटोची छेडछाड केली. त्यांचा फोटो चित्रविचित्र अश्लील अवस्थेत बनवून किरण यांना वारंवार कॉल करून पैसे मागितले. १२ हजार रुपये बँक खात्यावर स्वीकारून पुन्हा वेगवेगळ्या फोनवरून कॉल करून त्यांना ब्लॅकमेल केले. पुन्हा त्यांच्याकडे ५१ लाख रुपये मागितले. पैसे दिले नाही तर सर्व फोटो गुगलवर टाकून बदनामी करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे बदनामीच्या भीतिपोटी किरण यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तसेच, खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखेमार्फत या प्रकरणाचा समांतर तपास चालू होता. पोलिसांनी आरोपी वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी निष्पन्न केले. ७ जून रोजी पथक आरोपींंच्या शोध घेण्यासाठी रवाना झाले. आरोपी नगेर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोलकाता येथील एका फ्लॅटमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, फ्लॅटवर छापा टाकून आरोपींना जेरबंद करण्यात आले.

दिघी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक नितीन अंभोरे, फौजदार सुनील भदाणे, पोलीस हवालदार किशोर कांबळे, सुनील कानगुडे, प्रदीप गोडांबे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

अशी होती टोळीची कार्यपद्धती
अटक आरोपी नवीन सिमकार्ड विकत घेऊन जी-मेल वर बनावट नावाने खाते तयार करत असत. त्याआधारे गुगलवर भारतातील वेगवेगळ्या शहरातील कॉलगर्लच्या नावाने मोबाईल क्रमांक अपलोड करत असत. त्यावर फोन आल्यावर कॉलगर्ल पुरवण्याच्या नावाखाली स्वत:च्या खात्यावर पैसे स्वीकारून पीडितांचा मोबाईल नंबर प्राप्त करून घेत असत. त्याच्यासोबत आय-किल कंपनीच्या व्हॉइस चेंज मोबाईलद्वारे महिलेच्या आवाजात बोलणी करून त्यावरून पीडितांच्या मोबाईल क्रमांकाद्वारे त्याच्या सोशल मीडियावरुन फोटो प्राप्त करून घेत असत आणि तेच फोटो चित्रविचित्र अवस्थेत बनवून त्यालाच व्हॉटसअ‍ॅपवर पाठवत असत. त्यानंतर त्याला वारंवार कॉल करून पैशाची मागणी करून पैसे स्वीकारत असत. तसेच, कोणी तक्रार करू नये म्हणून फक्त ५ ते १० हजार रुपये स्वीकारत असत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest