पुणे : मुजोर पोलिसाची पीएमपी चालकाला बेदम मारहाण!, व्हिडीओ व्हायरल (Video)
पीएमपी बसचालकाला रविवारी चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याने बसमध्ये जाऊन बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे पीएमपी कर्मचाऱ्यांनी पोलिसावर संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा व्हीडीओ समाजमाध्यमातून व्हायरल झाला आहे. दरम्यान, हा प्रकार पोलीस ठाण्यात पोहोचला असता दोघांनाही समजावून सांगितल्याने कोणतीही तक्रार नोंदविण्यात आली नाही. मारहाण करणाऱ्या पोलिसाने माफी मागितल्यावर प्रकरणावर पडदा पडला. तसेच मारहाण करणाऱ्या पोलिसाकडून पीएमपीने बसचा खोळंबा केल्याबद्दल रितसर तीन हजारांचा दंड वसूल केला. त्याची त्याला पावतीही दिली आहे.
View this post on Instagram
रविवारी सकाळी वाडिया महाविद्यालयापासून मार्ग क्रमांक सी ३०२ ही बस न. ता. वाडीकडे प्रवाशांना घेऊन निघाली होती. त्या दरम्यान एक पोलीस कर्मचारी दुचाकीने प्रवास करत होता. अचानक पोलिसाने त्याची दुचाकी बससमोर आडवी लावली. पोलीस कर्मचाऱ्याने दुचाकीवरून उतरून बसचालकाला शिवीगाळ केली. त्यानंतर पोलीस कर्मचारी या चालकाला बेदम मारहाण करत असल्याचे व्हीडीओमध्ये दिसून येत आहे. पोलिसाने डोक्यावर हेल्मेट परिधान केले आहे. तो पीएमपी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करताना दिसत आहे. त्यावेळी चालकाकडून बचाव केला जात असल्याचे दिसत आहे. चालकाकडून पोलीस कर्मचाऱ्याला मला का मारत आहेस, नेमकी काय चूक झाली आहे, तुला काय हवे आहे, अशी विचारणा केली जात आहे. मात्र त्यानंतरही पोलीस कर्मचारी मारत असल्याचे व्हीडीओमध्ये दिसत आहे. दुचाकीला बाजूला दाबले आहे का, रस्त्याचे काम सुरू आहे, असे सांगून चालक पोलीस कर्मचाऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यावर पोलीस कर्मचारी कोणतीही प्रतिक्रिया न देता मारहाण करून बसमधून बाहेर गेल्याचे दिसून येत आहे.
या प्रकारामुळे पीएमपी चालकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. हा मारहाणीचा प्रकार घडल्यानंतर पीएमपी चालकाने जवळच्या कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसाने मारहाण केल्याची तक्रार केली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी बसचालकाला आणि मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला समजावून सांगितले. पोलीस तक्रार केली तर दोघांनाही त्रास होईल, असे समजावून सांगितले. फौजदारी कारवाई होईल, या भीतीने पोलीस कर्मचाऱ्याने माफी मागितली. तसेच चालकानेदेखील पोलिसांचा कोणत्याही प्रकारचा ससेमिरा मागे लागू नये, म्हणून रितसर पोलीस तक्रार केली नाही. दोघांनाही समज देऊन पोलिसांनी सोडून दिले. तसेच पोलीस कर्मचाऱ्याकडून लेखी लिहून घेतल्याचे पीएमपी प्रशासनाने ‘सीविक मिरर’ला सांगितले.
दरम्यान, संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधोत कोणतीही तक्रार दिली नसल्याने या प्रकरणावर पडदा पाडण्यात आला. या प्रकरणाची बाहेर चर्चा होणार नाही, याची काळजी घेतली जात होती. मात्र मारहाणीचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात या चालकाने पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध आपली कोणतीही तक्रार नसल्याचे पत्र दिले आहे.
रविवारी सकाळी वाडिया कॉलेजजवळ बसचालकाने दुचाकी बाजूला दाबल्याचा पोलिसाचा आरोप होता. त्या रागातून पोलिसाने त्याला मारले. रस्त्याचे काम सुरू आहे, दुचाकी दाबली नाही, असे सांगूनही पोलिसाने मारहाण केली. या प्रकारानंतर चालकाला पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करण्यास सांगितले होते. मात्र पोलिसांची भीती तसेच पोलिसांनी समाजावून सांगितल्याने त्याने लेखी तक्रार केली नाही. दोघांनाही समजावून सांगितले असून लेखी घेतले आहे. पीएमपी बसचालकाला एका पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण करणे हे चुकीचेच आहे. बस मार्गात अडथळा आणल्याने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याकडून पीएमपीने तीन हजार रुपये बस खोळंबा वसूल केले आहे. याची नियमाप्रमाणे पोलीस कर्मचाऱ्याला पावती दिली जाणार आहे.
- अशोक साबळे, अपघात विभाग प्रमुख, पीएमपी प्रशासन