संग्रहित छायाचित्र
दोन वर्षासाठी तडीपार केलेल्या वाघोली येथील एकास केसनंद येथून गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) जेरबंद केले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी त्याला वाघोली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. गणेश काळे (वय, ३४, रा. वाघोली) असे या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, रेकॉर्ड वरील तडीपार गणेश काळे हा केसनंद येथील लाडबा वस्ती येथील महादेव मंदिराशेजारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने शिताफीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. काळे याच्यावर लोणीकंद पोलीस ठाणे येथे चोरी (सह मोक्का), गंभीर दुखापत, मपोका १४२ कारवाई यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्याला २८ ऑक्टोबर २०२२ पासून २ वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. केसनंद येथे तो मिळून आल्याने त्याचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपासासाठी त्याला वाघोली पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक, युनिट -६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, बाळासाहेब तनपूरे, गणेश डोंगरे, किर्ती नरवडे, प्रतीक्षा पानसरे यांनी केली.