सिगारेटला २० रुपये दिले नाही, मुलाची आईला बेदम मारहाण
सिगारेट घेण्यासाठी आईकडे २० रुपये मागितले. मात्र, आईने २० रुपये न दिल्यामुळे लेकाने आपल्याच आईला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुला विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माधव राजाराम कांबळे (वय २७) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. तर या प्रकरणी आई सखुबाई राजाराम कांबळे (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधवने आई सखुबाई यांच्याकडे सिगारेटसाठी २० रुपये मागितले होते. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी त्याची भावाशी वादावादी झाली. सखुबाई यांनी भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी माधवने आईच्या हातावर बांबू मारला. मारहाणीत आईचा हात फ्रॅक्चर झाला. त्यानंतर आईने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.