संग्रहित छायाचित्र
आई-वडील रागावल्यामुळे अनेकदा लहान मुले घर सोडून जातात. रागाच्या भरात निघून गेलेल्या मुलांचे पुढे हाल होतात. अनेकदा त्यांच्यावर अत्याचार होतात तर, अनेकांना मजुरी करून जगावे लागते. असाच वडील रागावल्याने घर सोडून निघून गेलेला १४ वर्षांचा मुलगा चार महिन्यांनी मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रेल्वे स्थानकावर आढळून आला. भारती विद्यापीठ पोलिसांनी कौशल्याने या मुलाचा शोध घेऊन त्याला आई-वडिलांच्या ताब्यात दिले. चार महिन्यांनी मुलाला पाहून आई-वडिलांचे डोळे आनंदाने भरून आले. हा मुलगा जबलपूर रेल्वे स्थानकावर पाण्याच्या बाटल्या विकून उदरनिर्वाह करीत होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तपास पथकाला पाच लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले.
याबाबतची माहिती अशी की हा मुलगा भारती विद्यापीठ परिसरात कुटुंबासह राहण्यास आहे. तो नववीमध्ये शिकत होता. त्याला चार महिन्यांपूर्वी एक दिवस वडील रागावले. त्यामुळे रागावून तो घरामधून निघून गेला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याबाबत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मुलाच्या वडिलांची सिक्युरिटी एजन्सी आहे. पोलिसांनी दरम्यान शोध सुरू केला. वडील रागवल्यानंतर मुलगा पुणे रेल्वे स्थानकातून रेल्वेने जबलपूरला गेला. तेथे त्याची कोणाशीही ओळख नव्हती. या ठिकाणी त्याने रेल्वे स्थानकात फेरीवाल्यांशी मैत्री केली. प्रवाशांना पाण्याच्या बाटल्यांची विक्री करण्याचे काम त्याने सुरू केले. एका खोक्याची विक्री केल्यानंतर त्याला १०० रुपये मिळत होते. दरम्यान, मुलाचा शोध न लागल्याने पुणे पोलिसांनी त्याचे छायाचित्र अन्य राज्यातील पोलिसांना पाठविले. मुलाची माहिती मिळाल्यास त्वरित कळवावी, अशी विनंती पोलिसांनी केली होती. बेपत्ता झालेला मुलगा जबलपूर रेल्वे स्थानकात पाण्याच्या बाटल्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांना मिळाली.
येवले यांनी याबाबतची माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी-पराजे, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांना दिली. त्यानंतर उपनिरीक्षक येवले, फिरोज शेख, हर्षल शिंदे जबलपूरला पोहोचले. रेल्वे स्थानकातून मुलाला ताब्यात घेतले. मुलाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. चार महिन्यांनंतर मुलगा घरी परतल्याने पालकांच्या डाेळ्यात आनंदाश्रू तरळले. शाळकरी मुलाचा शोध घेणाऱ्या तपास पथकाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पाच लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले.ै