संग्रहित छायाचित्र
गणेशखिंड रस्ता परिसरात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाकडील सोनसाखळी हिसकावून पसार झालेल्या चोरट्यांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
अजगर जावेद इराणी (वय २१ रा. इराणी वस्ती, विष्णुकृपा नगर, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी इराणीबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक २४ ऑक्टोबर रोजी गणेशखिंड रस्त्यावरील अशोकनगर परिसरातून सकाळी फिरायला निघाले होते. चोरट्यांनी ज्येष्ठाला अडविले. पत्ता विचारण्याचा बहाणा चोरट्यांनी केला. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी गळ्यातील दोन तोळ्यांची सोनसाखळी चोरली. दुचाकीवरून चोरटे पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले.
तांत्रिक तपासात चोरटे जंगली महाराज रस्ता परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून इराणी आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीनाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ज्येष्ठाकडील सोनसाखळी, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, साहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक प्रवीण चौगले, ऋषिकेश वाघवले, श्रीधर शिर्के, बाबा दांगडे यांनी ही कारवाई केली.