श्वानाला मारहाण करून जीवंत जाळले; मुंढवा येथील केशवनगरमधील घटना
पुणे : एका आठ महिन्यांच्या श्वानाला अत्यंत निर्दयीपणे मारहाण करून त्यानंतर जीवंत जाळण्यात आल्याची घटना उजेडात आली आहे. ही घटना मुंढवा येथील केशवनगर येथील आर. एस. एंटरप्रायजेसजवळ घडली. मागील शुक्रवारी दुपारी घडलेला हा प्रसंग समोर आल्यानंतर प्राणीप्रेमींसह सर्वसामान्य नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
प्रत्यक्षदर्शी असलेल्या दोन मुलांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, ललिया नावाच्या या परिया जातीच्या श्वानाला एक कुटुंब सांभाळत होते. त्याची देखरेख करणाऱ्या या कुटुंबातील भीरु डोलारे नावाच्या तरुणाने या श्वानाला खायला घालण्याच्या बहाण्याने जवळ बोलावले. त्याला बांबूच्या काठीने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेला श्वान रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडला. त्यानंतर या मुलाने त्याचे पाय केबलने बांधले. त्याला फरफटत नेऊन एका खड्ड्यात फेकून दिले. इतक्यावरच न थांबता, निर्दयी डोलारे याने पेट्रोलसारखा ज्वलनशील पदार्थ श्वानावर ओतून त्याला जिवंत जाळले. त्याच्यावर कागद, काड्या, काड्या वगैरे टाकून ही आग आणखी पेटवली. आत्यंतिक वेदनेने विव्हळत असलेल्या त्या श्वानाच्या आवाजामुळे स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. मात्र, तो पर्यन्त त्याचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, पुण्यातील 'मिशन पॉसिबल फाउंडेशन' या एनजीओच्या प्रमुख आणि प्राणीप्रेमी, ६६ वर्षीय पद्मिनी पीटर स्टंप यांनी यासंदर्भात मुंढवा पोलीस ठाण्यात भीरू डोलारे विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्याच्याविरुद्ध प्राण्यांचे निर्दयतेपासून संरक्षण कायदा, १९६० अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप म्हणाले, ‘संशयास्पद व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमचा पुढील तपास सुरू असून आम्ही सर्व तथ्य पडताळून पाहात आहोत.’
तर, पद्मिनी स्टंप म्हणाल्या, ‘शुक्रवारी माझ्या ओळखीच्या नागमा शिकलगर यांनी फोन करून सांगितले की, एक आठ महिन्याच्या श्वानाला निर्दयीपणे मारहाण करून जाळून मारण्यात आले आहे. ही माहिती मिळताच आम्ही घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. मृत श्वानाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेले. त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झालेल्या अनेक जखमा आणि जळाल्यामुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचे दोन पाय गायब होते. हा प्रकार अत्यंत अमानवी होता. आम्हाला त्या श्वानासाठी न्याय हवा आहे.’
स्थानिक रहिवासी नगमा शिकलगर म्हणाल्या, ‘ललिया हे खूप गोड श्वान होते. मी त्याला नेहमी खाऊ घालत असे. अनेक मुले त्याच्याशी खेळायची. हे श्वान एका शेतात राहात होते. त्या शेताची देखरेख करणाऱ्याने त्याला अगदी लहानपणापासून पाळलेले होते. काही आठवड्यांपूर्वी त्याने दुसरे श्वान आणले. त्यानंतर त्याच्या कुटुंबाने ललियाकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. त्याला रस्त्यावर सोडून दिले. ते शेताजवळ गेले की भीरू डोलारे त्याला मारहाण करीत असे. त्याच्यावर दगड मारत असे. त्याने दुसरीकडे निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथल्या भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याच्याकडे परत येण्यावाचून दुसरा पर्याय उरला नव्हता. घटनेच्या दिवशी ललियाचा वेदनाविव्हळ आवाज ऐकून मी तिकडे धावले. मात्र, या घटनेचे साक्षीदार असलेल्या दोन मुलांनी श्वानाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ‘मिरर’ने डोलारेच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. ते म्हणाले, की ललिया आक्रमक झाला होता आणि त्याने डोलारेच्या आईचा चावा घेतला होता. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संजय माळी आणि पोलीस उपनिरीक्षक एम. यू. लिम्भे या प्रकरणाचा तपास करत आहेत.