Pune Crime News : विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरणारा गजाआड, २७ लॅपटॉप, १ टॅब आणि १ मोबाईल जप्त

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॉलेज परिसरातील हॉस्टेलमध्ये प्रवेश करून विद्यार्थ्यांच्या रूममधून लॅपटॉप लंपास करणाऱ्या चोरट्याला लोणीकंद पोलिसांनी जेरबंद केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 24 Oct 2023
  • 11:45 am
Pune Crime News : विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरणारा गजाआड, २७ लॅपटॉप, १ टॅब आणि १ मोबाईल जप्त

विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरणारा गजाआड, २७ लॅपटॉप, १ टॅब आणि १ मोबाईल जप्त

लोणीकंद पोलिसांची कारवाई

लक्ष्मण मोरे

पुणे : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॉलेज परिसरातील हॉस्टेलमध्ये प्रवेश करून विद्यार्थ्यांच्या रूममधून लॅपटॉप (Pune Crime News) लंपास करणाऱ्या चोरट्याला लोणीकंद पोलिसांनी जेरबंद (Arrested) केले आहे. त्याच्याकडून पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागातील १८ गुन्हे उघडकीस (Crime) आणण्यात आले असून दहा लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Lonikand police)

निलेश प्रफुल चंद्र कर्नावट (वय ४९, रा. नांद्रा, ता. पाचोरा, जळगाव) असे आरोपीचे नाव आहे. तो मार्च महिन्यात जेलमधून सुटला होता. त्याला यापूर्वी देखील चोरीच्या गुन्ह्यात अटक झालेली होती. तो फिरस्ता असून अवघ्या तीन ते पांच हजारात तो चोरीचे लॅपटॉप विकत होता.  या आरोपीने पुणे शहरातील रायसोनी कॉलेज, सिंहगड कॉलेज, सिम्बॉयसिस महाविद्यालय, एमआयटी कॉलेज, वारजे माळवाडी, देहू, बिबवेवाडी, लोणावळा परिसरातून लॅपटॉप चोरी केल्याचे समोर आले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील एका नामवंत कॉलेजच्या परिसरामध्येच विद्यार्थ्यांचे हॉस्टेल आहे. या होस्टेलमध्ये प्रवेश करून चोरट्याने रूममध्ये चार्जिंगला लावलेले आणि विद्यार्थ्यांचे अनेक लॅपटॉप चोरी करून नेले होते. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते.

वारंवार घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पद्धतीचा (मोडस ऑपरेंडी) अभ्यास करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ काईंगडे, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, रवींद्र गोडसे यांनी रायसोनी कॉलेज परिसरामध्ये गस्त वाढवली होती. तसेच, सापळा देखील रचण्यात आलेला होता. रायसोनी कॉलेज परिसरात गस्त सुरू असतानाच पोलिसांना लॅपटॉप चोरी करणारा चोरटा कॉलेजच्या मुख्य गेट समोर उभा असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली. दरम्यान, लॅपटॉप चोरी झालेल्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तोच आरोपी असल्याचे देखील समोर आले. त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आले असता न्यायालयाने पोलीस कोठडी दिली होती. त्याच्याकडे तपास करत असताना त्याने विविध लोकांना विकालेल्या लॅपटॉपबाबत माहिती दिली. त्याच्याकडून लॅपटॉप खरेदी केलेल्या ग्राहकांना संपर्क साधत पोलिसांनी २७ लॅपटॉप, एक टॅब आणि एक मोबाईल हँडसेट असा दहा लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  पुढील तपास पोलीस नाईक अजित फरांदे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest