Pimpri-Chinchwad Ganeshotsav 2024: उद्योगनगरीत थाटामाटात निघणार विसर्जन मिरवणुक

गेल्या दहा दिवसापासून मनोभावे पूजा अर्चा करणाऱ्या गणपती बाप्पांना मंगळवारी निरोप देण्यात येणार आहे. स्वागतासाठी सज्ज झालेली पिंपरी चिंचवड शहर आता विसर्जन मिरवणुकीचा आनंद द्विगुणीत झाला आहे. त्यासाठी आकर्षक रथ, विद्युत रोशनाई आणि फुलांची आरस तयार करण्यात कार्यकर्ते गुंतले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 16 Sep 2024
  • 05:08 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

आकर्षक, विद्युत घोषणा रथ तयार, ढोल ताशा, बँजो, डॉल्बीचा होणार दणदनाट

गेल्या दहा दिवसापासून मनोभावे पूजा अर्चा करणाऱ्या गणपती बाप्पांना मंगळवारी निरोप देण्यात येणार आहे. स्वागतासाठी सज्ज झालेली पिंपरी चिंचवड शहर आता विसर्जन मिरवणुकीचा आनंद द्विगुणीत झाला आहे. त्यासाठी आकर्षक रथ, विद्युत रोशनाई आणि फुलांची आरस तयार करण्यात कार्यकर्ते गुंतले आहेत. चिंचवड येथील चापेकर चौक, पिंपरी कराची चौक, रावेत या प्रमुख मार्गांवर मिरवणुका पुढे मार्गस्थ होतात. या सोहळ्यासाठी महापालिका प्रशासन, पोलीस आणि सामाजिक संघटना व संस्था सोहळा निर्विघ्न पणे पार पडण्यासाठी तैनात असणार आहेत. 

अनंत चतुर्थदशीच्या दिवशी शहरातील  गणेशविसर्जन मिरवणुका विविध भागातून निघतात. त्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची विसर्जन मिरवुणकीसाठी आकर्षक रथ बनविण्याचे काम सुरु आहे. कार्यकर्त्यांकडून रात्रभर जागून विसर्जन मिरवणुकीचे काम पूर्ण केले जात आहेत. ज्या प्रकारे गणरायाचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. दहा दिवस मनोभावे भाविकांनी गणरायाची सेवा केली. आता गणपती चालले गावाला असे म्हणत निरोप देण्याची वेळ आली आहे. निरोप देताना देखील वाजत गाजत मिरवणुक काढण्यात येणार आहे. सार्वजनिक मंडळे, विविध गृहनिर्माण सोसायटी, कंपन्या आणि छोटी मंडळी सुद्धा यासाठी तयारी करत आहेत. 

देखाव्याप्रमाणेच आकर्षक रथ सजावटीची स्पर्धा लागलेली आहे. राधाकृष्ण, विठ्ठल, रुक्मिणी, हत्ती रथ, रामलल्लाच्या स्वरूपातील मूर्ती असलेल्या रथांची सजावट करण्यात येत आहे. तर, काही ठिकाणी रंगबेरंगी अशा फुलांचा आकर्षक रथातील हंसाची जोडी तयार करण्यात आला आहे. याबरोबरच प्राचीन गणेश मंदिर आणि विद्युत रोषणाईंवर आधारित काल्पनिक मंदिरांच्या प्रतिकृती, विविध प्रकारच्या वाद्यांच्या सजावटीतला फुलांचा रथ तसेच रथावर समाजप्रबोधनपर देखावे विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळणार आहेत. अनेक मंडळे या दिवशी सामाजिक घटनांवर जिवंत देखावा ही साजरा करतात. तसेच, काही मंडळाकडून त्याबाबत जनजागृती ही देखील केली जाते. शहरात पिंपरी आणि चिंचवड मध्ये मुख्य मिरवुणका असतात. त्यावेळी प्रत्येक मंडळाला सादरीकरणासाठी वेळ दिला जातो. यावेळी मिरवुणकीमध्ये ढोल ताशामुळे रंगत येत असते. ढोल ताशा पथके, मर्दानी खेळ, लेझीम सारख्या पारपंरिक कलांचे सादरीकरण देखील पहायला मिळणार आहे

ढोल ताशाचा निनाद, डॉल्बी डीजेचा दणदणाट 
भव्य दिव्य अशा मिरवणुकीमध्ये आकर्षक रथातून येणार्‍या गणरायाला निरोप देण्यासाठी ढोल - ताशा मंडळे देखील सज्ज झाली आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात डॉल्बी देखील आरक्षित करण्यात आले आहे. त्यासाठी भाविकांना आमंत्रण देण्यात आली असून, विसर्जन मिरवणुकी माहितीसाठी फ्लेक्सही उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे विविध ठिकाणी राजकीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना देखील बोलवण्यात आले आहे.

महावितरणचे साडेचार हजार कर्मचारी
या उत्सवात महावितरणची पुणे परिमंडल अंतर्गत यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच ग्रामीण भागात ४ हजार ५७५ अभियंते, तांत्रिक कर्मचारी नेमण्यात आले आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांची ठिकाणे आणि मोठ्या मिरवणुका निघणारे मार्ग या ठिकाणी गणेशोत्सवापूर्वी वीजयंत्रणेची पाहणी करून देखभाल व दुरूस्तीचे कामे करण्यात आली आहेत.  

विसर्जन मिरवणुकींच्या कालावधीत मोबाईल व्हॅन व आवश्यक साधनसामुग्रीसह अभियंता व कर्मचाऱ्यांचे पथक उपलब्ध राहणार आहे.  नागरिकांनी देखावे किंवा मिरवणूक पाहण्यासाठी वीजयंत्रणा किंवा फिडर पिलरवर चढू नये किंवा त्याचा आधार घेऊ नये. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये उभे राहून उंच झेंडे उंचावताना उपरी वीज वाहिन्यांपासून सावध राहावे.

महापालिकेच्या वतीने उभारणार स्वागत कक्ष
यंदाची गणेशोत्सवाची सांगता पर्यावरण आणि सुरक्षित व उत्साहात करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. शहरात 85 ठिकाणी विसर्जन हौद, मूर्ती संकलन आणि मूर्तिदान उभारण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे चौका चौकात देखील कृत्रिम हौद उभारण्यात आले आहेत. कोणतीही अनुचित प्रकार घडू नये, त्यासाठी जीव रक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत. शहरातील विर्जन घाटांवर दिशादर्शक व स्थळदर्शक फलक लावण्यात आले आहेत.  विसर्जन घाटांवरील निर्माल्यकुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे.  गणेश मंडळ आणि गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी पिंपरी येथील कराची चौक तसेच चिंचवड येथील चापेकर चौकात महापालिकेच्या वतीने  स्वागत कक्षात उभारण्यात येत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest