‘आंदेकर’च्या ऑफिसला ये, मग दाखवते मी कोण ते?' ; अनधिकृत पथारीधारकांवरील कारवाईदरम्यान महिला पोलिसांना धमकी, मारहाण

अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत पथारीधारकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या दोन महिला पोलिसांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पथारी लावलेल्या महिलांनी यावेळी महिला पोलिसांच्या गणवेशाची बटने तोडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 19 Sep 2024
  • 01:17 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत पथारीधारकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या दोन महिला पोलिसांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पथारी लावलेल्या महिलांनी यावेळी महिला पोलिसांच्या गणवेशाची बटने तोडली. तसेच, पोलिसांना धमकावत तुला आंदेकरच्या ऑफीसला नेऊन दाखवते... मी कोण आहे ते?’ असे म्हणत बघून घेण्याची धमकी दिली. 

ही घटना १६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता मुळचंद दुकानाच्या कॉर्नरलगतच्या टी एम्पोरीयमशेजारी घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दगडूशेठ मंदिरात दर्शनाला येण्यापूर्वी घडली.

याप्रकरणी महिला पोलीस शिपाई अश्विनी बनसोडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उमा राजेंद्र रणदिवे (वय ३४), रोशनी राजेंद्र रणदिवे (वय १९, रा. धनकवडी) या आई व मुलीसह आणखी तीन महिलांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बनसोडे आणि सहकारी पोलीस कर्मचारी सपकाळ, पोलीस हवालदार सय्यद असे सर्वजण दगडूशेठ गणेशोत्सव मंडपाजवळ बंदोबस्तासाठी तैनात होते.बेलबाग चौक परिसरात पदपथावर वस्तुंचे स्टॉल आणि पथारी लावलेल्या होत्या. अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या पथारी हटवण्याचे काम सुरू होते. त्याठिकाणी उमा रणदिवे आणि रोशनी रणदिवे या दोघी बांगड्या विकत बसलेल्या होत्या. पोलिसांनी त्यांना पथारी काढण्यासाठी सूचना केल्या. तसेच, रस्त्यावर अडथळा निर्माण करू नका, अशी समज दिली. त्यावेळी आरोपींनी ‘ए चल निघ तू, आम्हाला नको सांगू.’ असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘तू पोलीस आहेस, म्हणून दादागिरी करीत आहेस का?’ असे म्हणत आरडाओरडा सुरू केला. रस्त्यावर गोंधळ नको आणि दौऱ्यात अडथळा नको म्हणून पोलिसांनी दोघींना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास सुरुवात केली. तेव्हा उमा हिने फिर्यादी यांना धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. फिर्यादी यांच्या गणवेशाची कॉलर पकडून त्यांना खाली खेचले. त्यावेळी त्यांच्या शर्टाची दोन बटणे तोडून हानी पोहोचवली. फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र तोडून नुकसान केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest