Fraud : 'टेलिग्राम' अँपद्वारे लाखोंची फसवणूक, कंपनीच्या मॅनेजरला २७ लाखांना लुबाडले

'टेलिग्राम' अँपचा वापर करून एका बड्या कंपनीमध्ये मॅनेजर पदावर काम करणाऱ्या महिलेला ऑनलाइन 'हॉटेल रिझर्वेशन'चे काम केल्यास चांगला मोबदला देण्याच्या आमिषाने २६ लाख ८८ हजार ६२ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 24 Oct 2023
  • 11:55 am
Fraud : 'टेलिग्राम' अँपद्वारे लाखोंची फसवणूक, कंपनीच्या मॅनेजरला २७ लाखांना लुबाडले

'टेलिग्राम' अँपद्वारे लाखोंची फसवणूक, कंपनीच्या मॅनेजरला २७ लाखांना लुबाडले

दोन वेगवेगळे गुन्हे दाखल

लक्ष्मण मोरे

पुणे : 'टेलिग्राम' अँपचा वापर करून (Telegram) एका बड्या कंपनीमध्ये मॅनेजर पदावर काम करणाऱ्या महिलेला (Fraud) ऑनलाइन 'हॉटेल रिझर्वेशन'चे काम केल्यास चांगला मोबदला देण्याच्या आमिषाने २६ लाख ८८ हजार ६२ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस (Fir) ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १० ऑगस्ट २०२३ पासून आजवर घडला. (Pune Crime News)

याप्रकरणी वृषाली महेंद्र दळवी (वय ४८, रा. गुडविल हेरिटेज, टिंगरे नगर) यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दळवी या एका कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. १० ऑगस्ट २०२३ रोजी त्यांच्याशी आरोपी टेलिग्राम आयडी धारकांनी फोनद्वारे ऑनलाईन संपर्क केला. त्यांना हॉटेल रिझर्वेशनचे काम असल्याचे सांगत हे काम केल्यास चांगला मोबदला मिळेल अशी बतावणी केली. त्यांनी त्याला होकार दिला. सुरुवातीला त्यांना काही प्रमाणात मोबदला देण्यात आला. त्यानंतर दुसरे काम देण्यासाठी एका बँक अकाउंटवर पैसे भरायला सांगण्यात आले. थोडे दिवस त्या ठिकाणी काम केल्यानंतर आणखी एक अकाउंटला थोडे पैसे ट्रान्सफर केल्यास हे काम सुरू राहील असे सांगण्यात आले.

त्यानुसार दळवी यांनी आणखी पैसे भरले. अशाप्रकारे आरोपींनी त्यांना तीन-चार अकाऊंटवर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानंतर या सर्व प्रक्रियेमध्ये घोटाळा झाला असून त्याची दुरुस्ती करावी लागेल अशी बतावणी करण्यात आली. ही दुरुस्ती करण्यासाठी आणखी ३४ लाख रुपये भरा, त्यानंतर सर्व काही सुरळीत होईल अशा प्रकारे त्यांना सांगण्यात आले. दळवी यांना त्यावेळी आपल्या सोबत फसवणुकीचा प्रकार घडला असल्याचे लक्षात आले. आपल्याला ऑनलाइन गंडा घातल्यात आल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला. त्या अर्जाचा तपास करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर करीत आहेत.

यासोबतच वानवडी पोलीस ठाण्यात देखील टेलिग्राम अकाउंट धारक अंजली पाटीदार आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे यूपीआय आयडी धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजा विजय मूर्ती (वय ४६, रा. सिल्वर क्लासिक बिल्डिंग, वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. राजा मूर्ती यांना टेलिग्राम आयडी धारकांनी मोबाईलद्वारे ऑनलाईन संपर्क साधला. त्यांना वेगवेगळे ऑनलाईन टास्क देऊन त्याद्वारे काम केल्यास अधिक परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या एका यूपीआय आयडीवर वेळोवेळी पैसे भरायला लावले. त्यानुसार, राजा मूर्ती यांनी परताव्याच्या अपेक्षेने एक लाख ७१ हजार रुपये भरले. परंतु, त्यांना कोणताही परतावा न देता आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याच्या चौकशीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest