पुणे: सायबर चोरटे सुसाट, तीन उच्चभ्रूंना ९६ लाखांस लुटले; एका प्रकरणात तर थेट इन्स्पेक्टर प्रदीप सावंत यांच्या नावानेच घातला गंडा

फेडेक्स कुरियर, केंद्रीय तपास यंत्रणाच्या नावाने तसेच शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याच्या बहाण्याने या तिघांना फसवण्यात आले आहे. पोलिसांनी आणि सायबर गुन्हे शाखेने वारंवार आवाहन करूनही उच्च शिक्षित व्यक्ती सायबर आर्थिक गुन्हेगारीला बळी पडत आहेत.

संग्रहित छायाचित्र

आयटी इंजिनियर, कंपनी मॅनेजरला सायबर चोरट्यांचा चुना

एक आयटीत... दुसरा खासगी कंपनीत मॅनेजर... तिसरा बड्या बांधकाम कंपनीत नोकरीला... तिघेही उच्च शिक्षित आणि सुखवस्तू. या तिघांनाही सायबर चोरट्यांनी थोड्याथोडक्या नव्हे तर ९६ लाख रुपायांना गंडवले आहे. एका प्रकरणात तर थेट इन्स्पेक्टर प्रदीप सावंत यांच्या नावानेच गंडा घातला आहे. या वेगवेगळ्या घटनांमध्ये लोणीकंद पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

फेडेक्स कुरियर, केंद्रीय तपास यंत्रणाच्या नावाने तसेच शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याच्या बहाण्याने या तिघांना फसवण्यात आले आहे. पोलिसांनी आणि सायबर गुन्हे शाखेने वारंवार आवाहन करूनही उच्च शिक्षित व्यक्ती सायबर आर्थिक गुन्हेगारीला बळी पडत आहेत.

याप्रकरणी वाघोलीत राहणाऱ्या ३८ वर्षीय व्यक्तीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा तरुण विमाननगरमधील एका आयटी कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर म्हणून नोकरी करतो. त्यांनी फसवणुकीबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. त्यांना १२ मार्च रोजी ते गुगलवर एआयई ट्रेड शेअर मार्केट विषयी माहिती घेत होते. त्यावेळी त्यांना शेअर मार्केटबद्दल एक लिंक दिसली. त्यांनी लिंकवर क्लिक केले. त्यानंतर ते स्टॉक व्हॅनगार्ड (Stock Vanguard) या व्हॉटसॲप ग्रुपमध्ये सहभागी झाले. या ग्रुपमध्ये ५७ सदस्य होते. या ग्रुपमध्ये  सुनील लिंघानिया हे सदस्यांना मार्गदर्शन करीत होते. त्यानंतर त्यांनी ‘डी२-१पीओ’ मध्ये (D2-1PO peak) सहभागी करून घेण्यात आले. या ग्रुपचे ॲडमिन व मार्गदर्शक सुनिल लिंघानिया, करण विर थिल्नन यांनी फिर्यादीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने संपर्क साधला. 

आरोपींनी त्यांना एलिस (ALICE) या मोबाईल ॲपमध्ये अकाउंट तयार करायला लावले. तसेच शेअर मार्केटमध्ये  गुंतवणुक करण्याच्या नावाखाली वेगवेगळया बँक खात्यावर वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगुन रक्कम ट्रान्सफर करायला लावली. तसेच, त्यांनी दिलेल्या मोबाईल ॲपमध्ये जाऊन शेअर ट्रेडिंग करायला लावले. या मोबाईल ॲपमध्ये त्यांनी केलेल्या ट्रेडिंगमध्ये नफा झाल्याचे भासविण्यात आले. मात्र, त्यांना प्रत्यक्षात कोणताही नफा वा परतावा न देता २१ लाख ९२ हजार ९२० रुपयांची फसवणूक करण्यात आली.

दुसरी फिर्याद  वाघोलीतील गेराज वर्ल्ड ऑफ जॉय या सोसायटीत राहणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाने दिली आहे. ते खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या मोबाईल क्रमांकावर २९ एप्रिल २०२४ रोजी फोन आला. त्यांना आरोपीने तो फेडेक्स कंपनीमधून हर्षवर्धन बोलत असल्याची बतावणी केली. त्याने फिर्यादींचे कुरियर मुंबई कस्टम्समध्ये अडकल्याचे सांगितले. 

हे पार्सल मुंबई येथील अंधेरी शाखेतून इराणला शेख अल-खलील या नावाने पाठविण्यात आल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर, पार्सलमध्ये पाच मुदत संपलेली पारपत्रे, चार एसबीआयची क्रेडीट कार्ड, ४५० ग्रॅम एमडीएम, २ किलो कपडे, १ खेळणे असल्याचे सांगितले. त्याने हे पार्सल तुम्हीच पाठवले आहे का अशी विचारणा केली. तेव्हा फिर्यादीने ते आपले पार्सल नसल्याचे सांगितले. त्यावर त्याने एनसीबी, मुंबई येथे जाऊन तक्रार करावी लागेल असे सांगितले. प्रत्यक्ष जाणे शक्य नसल्यास ऑनलाईन तक्रार दाखल करण्यास सांगत त्यांचा फोन दुसऱ्याला ट्रान्सफर केला. त्याने त्याचे नाव प्रदीप सावंत असल्याचे सांगितले. त्याने स्काईप ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यांना एक आयडी देण्यात आला. 

सावंत नाव सांगणाऱ्या आरोपीने फिर्यादीची सर्व माहिती विचारून घेतली. त्यांना कारवाईची भीती दाखवण्यात आली. त्यांना सहकार्य करण्यास सांगत त्रास देणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर, वेगवेगळी कारणे देत त्यांना १२ लाख रुपये ट्रान्सफर करायला लावले. त्यानंतर, आरोपींनी फिर्यादीचा फोन घेणे बंद केले. त्यानंतर त्यांना ३० एप्रिल रोजी सकाळी बँकेच्या रिलेशनशीप मॅनेजरने फोन करून पर्सनल लोन घेतले आहे काय, अशी विचारणा केली. त्यांच्या नावावर २९ लाख ५२ हजार रुपयांचे कर्ज काढण्यात आलेले होते. अशा प्रकारे त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

तिसरी तक्रार वाघोली येथील ऑक्सी व्हॅली येथे राहणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीने दिली आहे. ते एका खासगी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांना आरोपींनी २० डिसेंबर २०२३ रोजी संपर्क साधून स्टॉक एक्स्चेंज संदर्भात सेशन घेणार असल्याचे कळवले. 

आरोपींनी पाठवलेली लिंक त्यांनी क्लिक केली. त्यानंतर ते एका व्हॉटसॲप ग्रुपमध्ये सहभागी झाले. त्या ग्रुपमधील जोनाथन सायमन याने लाईव्ह सेशन घेण्यास सुरुवात केली. या ग्रुपमधील ८ अँडमिन तसेच फिर्यादी यांना अलपॅकसिस प्रो (AIpaxis Pro) हे ऑप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यांना शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांना वेळोवेळी विविध बँक खात्यांवर रक्कम भरण्यास सांगण्यात आले. फिर्यादीने ज्या-ज्या बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर केले 

त्यासंदर्भात देण्यात आयलेला मोबाईल क्रमांक बंद करून संपर्क तोडण्यात आला. अशा प्रकारे शेअर ट्रेडींगच्या बहाण्याने त्यांची ४५ लाख ३० हजारांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

"सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. यासंदर्भात सायबर गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज येत आहेत. सर्वाधिक सुशिक्षित व्यक्ती या फसवणुकीला बळी पडत आहेत. शेअर मार्केट नफा, फेडेक्स कुरियर, केंद्रीय तपास यंत्रणांच्या नावाने  लाखों रुपयांची फसवणूक केली जात आहे. नागरिकांनी पैसे गुंतवताना, तसेच आमिषाला बळी पडण्याआधी सर्व खातरजमा करावी. ऑनलाईन व्यवहार शक्यतो टाळावेत. दाखल गुन्ह्यांचा तपास सुरू आहे."
- कैलास करे, वरिष्ठ निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest