चिखली : सोन्या तापकीर हत्या प्रकरण : मास्टर माईंड आरोपीसह ३ जणांना भारत-नेपाळ बॉर्डरवरून अटक

मास्टर माईंड आरोपीसह ३ जणांना पोलीसांनी भारत-नेपाळ बॉर्डरवरून अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवडच्या गुंड विरोधी पथकाने केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 4 Jul 2023
  • 04:46 pm
सोन्या तापकिर हत्या प्रकरण : मास्टर माईंड आरोपीसह ३ जणांना भारत-नेपाळ बॉर्डरवरून अटक

मास्टर माईंड आरोपीसह ३ जणांना भारत-नेपाळ बॉर्डरवरून अटक

आरोपींना न्यायालयाने सुनावली ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

पिंपरी चिंचवडमधील चिखली परीसरात वरचढ होईल आणि तो आपलाच काटा काढील या भितीने सराईत गुन्हेगार सोन्या तापकीर याची हत्या करण्यात आली आहे. २२ मे रोजी सोन्या तापकीरवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. अखेर या प्रकरणातील मास्टर माईंड आरोपीसह ३ जणांना पोलीसांनी भारत-नेपाळ बॉर्डरवरून अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवडच्या गुंड विरोधी पथकाने केली आहे.

करण रतन रोकडे (वय २५, रा. आंबेडकर भवन समोर, चिंतामनीनगर, रोकडे वस्ती, चिखली, पुणे), ऋत्विक ऊर्फ मुंग्या रतन रोकडे (रा. सदर), रिंकु दिनेश कुमार (वय १९, रा. सदर) आणि  विधी संघर्षीत बालक असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार सोन्या तापकीरचा भरदिवसा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. ही हत्या मुख्य आरोपी करण रोकडे याने आपल्या साथीदारांच्या मदतीने केली होती. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळा काढला. या प्रकरणी पोलीसांनी चिखली पोलीस ठाण्यात कलम ३०२, १२०(ब) भा. ह. का. कलम ३,, २५ महा. पो. का. क. ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. त्यानुसार पोलीस आरोपींचा शोध घेत होते.

मात्र, गुन्हा घडल्यापासुन अटक चुकवण्यासाठी आरोपी लोणावळा, गोवा, मध्यप्रदेश, गुजराथ आणि उत्तरप्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये फिरत होते. राहण्याची ठिकाणे वेळोवेळी बदलून व स्वतःचे अस्तित्व लपवुन रहात ते होता. याबाबत अखेर खबऱ्यामार्फत गुंडा विरोधी पथकातील पोलीसांना माहिती मिळाली. मुख्य आरोपी करण रोकडे हा उत्तर प्रदेश राज्यातील मथुरा येथे असल्याची खात्रीशीर माहीती प्राप्त झाली. माहिती मिळाताच पोलीसांचे पथक उत्तर प्रदेशात पोहोचले.

मात्र, करण रोकडे हा मथुरे पासुन सुमारे ७५० किलोमीटर लांब असलेल्या भारत नेपाळ बॉर्डरजवळील मऊ जिल्ह्यातील मधुबन येथे असून तो नेपाळला पळुन जाण्याच्या तयारीत असल्याचे पोलीसांना समजले. पोलीसांनी आरोपी पळून जाण्याच्या आधिच ते राहत असलेल्या इमारतीला वेढा घातला. मात्र, पोलीस आपल्याला पकडायला आल्याची चाहूल लागताच आरोपी करण रोकडे आपल्या ०३ साथीदारांसह पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन शेतामध्ये पळून जात होता. करणने शेताचा रस्ता पकडताच पोलीसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले.

ताब्यात घेतल्यानंतर सर्व आरोपींना पिंपरी चिंचवडमध्ये आणण्यात आले. पिंपरी चिंचवडमधील चिखली पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिल्यानंतर आरोपींना मोरवाडी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. पोलीसांची मागणी मान्य करत न्यायालयाने आरोपींना ०६ जुलैपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest