Pune Crime News : आर्मी जवानाने पोलिसाच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक, शिवाजी रस्त्यावरील थरार

दीड महिन्यांपूर्वी ट्रीपल सीट जाणाऱ्यांना थांबवून कारवाई केल्याने चिडलेल्या आर्मी जवानाने पोलिसाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक मारत खुनी हल्ला केला. शिवाजी रस्त्यावरील बुधवार चौकात बुधवारी (२५ ऑक्टोबर) रात्री साडे आठच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 26 Oct 2023
  • 12:00 pm
Pune Crime News : आर्मी जवानाने पोलिसाच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक, शिवाजी रस्त्यावरील थरार

संग्रहित छायाचित्र

रोहित आठवले

दीड महिन्यांपूर्वी ट्रीपल सीट (triple seaters) जाणाऱ्यांना थांबवून कारवाई केल्याने चिडलेल्या आर्मी जवानाने (army jawan) पोलिसाच्या (Traffice Police) डोक्यात सिमेंट ब्लॉक मारत खुनी हल्ला केला. (Pune Crime News) शिवाजी रस्त्यावरील बुधवार चौकात (Budhwar Chowk) बुधवारी (२५ ऑक्टोबर) रात्री साडे आठच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Pune News)

रोमेश डावरे असे गंभीर जखमी झालेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर वैभव मनगुटे या आर्मी जवानाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मनगुटे हा मूळचा सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे. तसेच तो भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून भरती झाला असून, सध्या पुण्यात प्रशिक्षणार्थी जवान आहे. मनगुटे हा त्याच्या दोन मित्रांसह दीड महिन्यांपूर्वी शिवाजी रस्त्यावरून दुचाकीवरून ट्रीपल सीट जात होता. तेव्हा डावरे हे बुधवार चौकात वाहतूक नियमन करीत होते.

दुचाकीवरून ट्रीपल सीट जाताना पाहून त्यांनी मनगुटे याला थांबविले. तेव्हा त्याने मी आर्मी जवान असल्याचे सांगितले. परंतु, तुम्ही सध्या ड्युटीवर नाहीत. तसेच दुचाकीवरून ट्रीपल सीट जात असल्याने तुम्हाला दंड भरावा लागेल असे डावरे यांनी सांगत मनगुटे याची दुचाकी थांबवून ठेवली होती. तसेच दंड भरून घेतल्यावर त्यांना सोडून दिले होते. तेव्हा या दोघांमध्ये वाद होऊन मनगुटे याने डावरे यांना बघून घेण्याची धमकी दिली होती.

वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांवर दररोज कारवाई होत असल्याने दीड महिन्यांपूर्वी घडलेला प्रकार डावरे हे विसरून गेले होते. दरम्यान, बुधवारी रात्री डावरे हे वाहतूक नियमन करीत असताना, मनगुटे हा पाठीमागून आला आणि त्याने डावरे यांच्या डोक्यात सिमेंट ब्लॉकने घाव घातले.

भररस्त्यात रहदारी सुरू असताना डावरे हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. तर मनगुटे हा पळून न जाताच जागेवर उभा राहिला. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या अन्य एका पोलिसाने डावरे यांना नागरिकांच्या मदतीने नजीकच्या सुर्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तसेच मनगुटे याला पकडून ठेवत अन्य पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतले.

भररस्त्यात घडलेल्या या प्रकारानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मनगुटे याला ताब्यात घेण्यात आले असून, सध्या त्याचवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तर डावरे यांना गंभीर इजा झाली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्या कुटुंबियांना त्यांना पुढील उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या प्रकाराने पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, दीड महिन्यांपूर्वी कारवाई केली म्हणून थेट खुनी हल्ला का करण्यात आला याची चौकशी मनगुटे याच्याकडे केली जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest