मुंबई क्राईम ब्रांच मधून बोलत असल्याचे सांगून ४५ लाखांची फसवणूक

मुंबई क्राईम ब्रांच मधून बोलत असल्याचे सांगून तुमच्या नावावर गुन्हे दाखल असून त्याची चौकशी करत असल्याचे सांगत अनोळखी व्यक्तींनी पिंपरी मधील एका वृद्ध व्यक्तीची ४५ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

मुंबई क्राईम ब्रांच मधून बोलत असल्याचे सांगून तुमच्या नावावर गुन्हे दाखल असून त्याची चौकशी करत असल्याचे सांगत अनोळखी व्यक्तींनी पिंपरी मधील एका वृद्ध व्यक्तीची ४५ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार १ जुलै ते ४ जुलै या कालावधीत पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी ६५ वर्षीय व्यक्तीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीस फोन करून तसेच सोशल मिडीयावर मेसेज, कॉल करून संपर्क केला. सुरुवातीला एकाने तो ट्राय मधून तसेच वेगवेगळी नावे वापरून मुंबई क्राईम ब्रांच मधून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्या आधारकार्डचा वापर करून सीम खरेदी केल्याचे व त्यावारे वेगवेगळ्या लोकांना व्हिडीओ कॉल, पोर्नोग्राफी, अश्लील मेसेज पाठवून मनी गॅम्बलिंग करण्यास आल्याचे सांगितले. 

त्याबाबत फिर्यादीवर गुन्हा दाखल असून त्याची आपण चौकशी करत असल्याचे फोनवरील व्यक्तीने सांगितले. मनी लॉन्ड्रिंगच्या एका प्रकरणात तुमच्या कागदपत्रांचा वापर करण्यात आला आहे. त्यात तुम्ही संशयित आहात, असे खोटे सांगितले. बनावट कागदपत्रे फिर्यादी यांच्या व्हाट्सअपवर पाठवून त्यांच्याकडून ४५ लाख २५ हजार रुपये रक्कम ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Share this story

Latest