तुम्ही सुविधा द्या, आम्ही कर आणि मत देऊ
नितीन गांगर्डे
बावीस हजार कोटींचा कर भरणारे वाघोलीकर नागरिक रविवारी पाणी आणि रस्त्यांच्या मूलभूत सुविधेसाठी रस्त्यावर उतरले. वाघोलीचे नागरिक विविध करांद्वारे २२ हजार कोटी देतात, मात्र आम्हाला रस्ते, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. सुविधा देत नसाल तर कर कशासाठी द्यावयाचा असा आमचा सवाल असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा नागरिकांनी दिला.
वाघोलीकर नागरिकांनी रविवारी, वाघोलीच्या महानगर सहायक आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. पाणी आणि रस्ते यासारख्या सुविधा मिळाव्यात यासाठीचे हे आंदोलन पुणे महानगर पालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विरोधात आहे. बाराशे ते पंधराशे नागरिक यात सहभागी झाले होते. येथील नागरिक २२ हजार कोटींचा कर भरत आहेत. तरीही येथे रस्ते पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. सुविधा नाहीत तर कर का द्यायचा असा त्यांचा प्रश्न होता. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा त्यांनी दिला.
शहराजवळील वाघोलीचा वर्षांपूर्वी पुणे महानगर पालिकेत समावेश झाला. मोठ्या संख्येने नागरिक येथे राहतात. येथे ४००-५०० सदनिकांच्या सोसायट्या आहेत परंतू त्यांना महानगरपालिकेच्या पाणी आणि रस्त्यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधाच मिळत नाही. सुविधा मिळाव्या यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेला अनेकदा अर्ज-विनंत्या केल्या आहेत. परंतू त्यांच्या पदरी निराशाच आली. सोसायट्यांमध्ये फ्लॅट घेण्यापूर्वी विकसकांनी नकाशावर रस्ता दाखवला होता. परंतू प्रत्यक्षात येथे चांगले रस्ते नाहीत. डी.पी. रस्ताही बनवला नाही. येथील रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे नेहमी अपघात होत असतात. ९ जानेवारीला एका शिक्षिकेचा आणि दोन दिवसांपूर्वी एका बालकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. अजूनही महानगरपालिकेचे डोळे उघडत नाहीत. अजून किती नागरिकांचा बळी गेल्यावर तुम्ही याकडे लक्ष देणार आहात, असा संतप्त प्रश्न नागरिक महापालिकेला विचारत आहेत.
महानगरपालिका येथील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवत नाही. नागरिकांना पिण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागते. त्यासाठी वर्षाला एक हजार कोटी रुपये पाण्याच्या टँकरवर खर्च होत आहेत, अशी माहिती आंदोलनकर्ते धीरज पाटील यांनी दिली.
वाघोलीतील नागरिकांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांची चार वेळा भेट घेऊन समस्या सोडवण्याची विनंती केली. यावर आयुक्तांनीच नागरिकांना उलट प्रश्न करत तुम्ही येथे कशाला फ्लॅट घेतले असे विचारले. शेवटी नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. २३ डिसेंबर २०२२ आणि २० जानेवारी २०२३ रोजी येथील नागरिकांनी दोन वेळा आंदोलन केले. त्याला प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा एकदा त्यांनी समस्या सोडवण्यासाठी महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. यात दीड हजारांहून
अधिक नागरिक सहभागी झाले. यावेळी मागण्या पूर्ण करेपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवणार आहोत अशी माहिती आंदोलनकर्ते धीरज पाटील यांनी दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.