चलन कारवाई टाळण्यासाठी रिक्षा चालकाचा डाव अंगाशी

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहतूक पोलिसांची चलन कारवाई टाळण्यासाठी एका रिक्षा चालकाने रचलेला डाव अंगाशी आला असल्याने पोलिसांनी रिक्षाचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दंड टाळण्यासाठी दुसऱ्या रिक्षाचा नंबर लावणे त्याला चांगलेच महागात पडले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 11 Aug 2023
  • 12:01 pm
चलन कारवाई टाळण्यासाठी  रिक्षा चालकाचा डाव अंगाशी

चलन कारवाई टाळण्यासाठी रिक्षा चालकाचा डाव अंगाशी

दुसऱ्याचा नंबर लावून रिक्षा फिरवल्याबद्दल फसवणुकीचा गुन्हा दाखल

#पुणे 

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहतूक पोलिसांची चलन कारवाई टाळण्यासाठी एका रिक्षा चालकाने रचलेला डाव अंगाशी आला असल्याने पोलिसांनी रिक्षाचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दंड टाळण्यासाठी दुसऱ्या रिक्षाचा नंबर लावणे त्याला चांगलेच महागात पडले. 

किरण पवाळ (रा. सम्राट चौक, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षाचालकाचे नाव असून  याप्रकरणी सुशील किसनराव भंडलकर (वय ४०, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी एका कंपनीत नोकरी करत असून त्यांच्या मालकीची एक ऑटो रिक्षा (एमएच १४/जेसी ९७११) आहे. ही रिक्षा त्यांचा मित्र प्रितम ननवरे चालवतात. २६ जुलै रोजी फिर्यादी सुशील यांना मोबाईलवर ५०० रुपये दंडाचे चलन आले. त्यानंतर २८ जुलै रोजी पुन्हा चलन आले. वारंवार नियमभंग करत असल्यामुळे सुशील यांनी रिक्षा चालक प्रितम यांना फोन करून विचारणा केली. मात्र प्रितम यांनी आपण मागील १५ दिवसांपासून आजारी असून रिक्षा थांबून असल्याचे सांगितले. त्यानंतर सुशील यांनी दंडाची पावती उघडून रिक्षाचा फोटो पाहिला असता त्यात त्यांच्या रिक्षाचा नंबर असलेली रिक्षा दिसली. मात्र त्यातील रिक्षा आणि चालकात खूप फरक असल्याने सुशील यांनी थेट पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात धाव घेतली.

आपल्या रिक्षाचा नंबर अनोळखी व्यक्तीने त्याच्या रिक्षाला लावला असून तो वाहतुकीचे नियम मोडत आहे. मात्र, रिक्षावर सुशील यांच्या रिक्षाचा नंबर असल्याने वाहतूक पोलिसांकडून सुशील यांनाच दंडाची पावती येत असल्याची लेखी तक्रार सुशील यांनी वाहतूक पोलिसांकडे केली.

९ऑगस्ट रोजी सुशील हे काळेवाडीतील तापकीरनगर येथे आले असता त्यांना त्यांच्या रिक्षाच्या नंबरशी साधर्म्य असलेली रिक्षा दिसली. त्यांनी तत्काळ ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. वाकड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत रिक्षा पोलीस ठाण्यात आणली. रिक्षाची पाहणी केली असता त्या रिक्षाचा नंबर एमएच १४/जेसी ५८०१ असा असल्याचे निष्पन्न झाले. त्या रिक्षाचा मालक किरण पवाळ याने सुशील यांच्या रिक्षाचा नंबर त्याच्या रिक्षाला लाऊन सुशील आणि सरकारची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story