मासिक पाळीच्या काळात तिला ठरवले ‘अस्पृश्य’
नितीन गांगर्डे
मासिक पाळीमध्ये महिलेला घरात अस्पृश्यतेची वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेच्या बाबतीत हा प्रकार एक वर्षाहून अधिक काळ सुरू होता. महिलेच्या कुटुंबीयांनीच तिचा छळ केला असल्याने अखेर ३७ वर्षीय पीडितेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला टिंगरेनगरची रहिवासी आहेत. तिचा कुटुंबीयांनी मासिक पाळीच्या काळात मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. पीडितेला मासिक पाळी आल्यावर सासू, सासरे, पती बाजूला बसवत होते. तिला घरातील कोणत्याच वस्तूला स्पर्श करू देत नव्हते. घरातील कापडी वस्तूला स्पर्श केल्यावर त्यांचा विटाळ होतो असे तिला सांगण्यात येत होते. त्यामुळे पीडितेला जमिनीवर झोपायला सांगितले जात होते. तसेच, तिला वेळेवर जेवणही दिले जात नव्हते. हा सर्व प्रकार पीडितेने पतीला सांगितला. यावर त्याने तिला शिवीगाळ केली व पती आणि सासू या दोघांनी मिळून तिला धमकावले, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार २५ मार्च २०२२ ते २ जून २०२३ पर्यंत सुरू होता.
पीडितेला तिच्या पती, सासू सासरे यांनी तिच्या माहेरी नेऊन सोडले. त्यानंतर तिला घटस्फोटासाठी नोटीस पाठवली. सतत होणाऱ्या छळाने महिलेची सहनशीलता संपली व तिने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी पीडितेचा पती, सासू, सासरे या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंडविधान संहितेतील कलम ४९८अ नुसार एखाद्या स्त्रीच्या पतीने किंवा पतीच्या नातेवाइकाने तिला क्रूर वागणूक दिल्यास असे कृत्य करणाऱ्याला तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. त्यासोबतच त्याला द्रव्यदंडाचीही शिक्षा होते. या कलमानुसार 'क्रूर वागणूक देणे' याचा अर्थ ज्यामुळे स्त्रीला आत्महत्या करणे क्रमप्राप्त होईल अथवा दुखापत होईल, तिच्या जीविताला, अंगाला किंवा स्वास्थ्याला धोका निर्माण होईल, अशा तऱ्हेचे कोणतेही वर्तन. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शरद माळी तपास करीत आहेत.