विद्यार्थ्यांनी शाळा सोडली, शिक्षकाने जीव

एकशिक्षकी प्राथमिक शाळेतील १० पैकी ९ विद्यार्थ्यांनी जवळच्याच बहुशिक्षकी शाळेत प्रवेश घेतल्याच्या कारणावरून निराश झालेल्या एकशिक्षकी प्राथमिक शाळेतील ४६ वर्षीय शिक्षकाने वर्गातच विषारी तणनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 10 Aug 2023
  • 11:28 am
विद्यार्थ्यांनी शाळा सोडली, शिक्षकाने जीव

विद्यार्थ्यांनी शाळा सोडली, शिक्षकाने जीव

दौंडच्या जावजीबुवाचीवाडी येथील एकशिक्षकी शाळेतील १० पैकी ९ विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याने निराश शिक्षकाची आत्महत्या

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@vijayCmirror

एकशिक्षकी प्राथमिक शाळेतील १० पैकी ९ विद्यार्थ्यांनी जवळच्याच बहुशिक्षकी शाळेत प्रवेश घेतल्याच्या कारणावरून निराश झालेल्या एकशिक्षकी प्राथमिक शाळेतील ४६ वर्षीय शिक्षकाने वर्गातच विषारी तणनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

 दौंड तालुक्यातील जावजीबुवाचीवाडी हद्दीतील जिल्हा परिषदेच्या होलेवस्ती प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. शिक्षकाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याने या धक्कादायक प्रकरणाची उकल होण्यास मदत झाली.

अरविंद ज्ञानेश्वर देवकर (वय ४६, रा. निसर्ग सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली, मूळ गाव - मावडी पिंपरी, ता. पुरंदर) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून, ते दोन महिन्यांपूर्वीच जावजीबुवाचीवाडी हद्दीतील जिल्हा परिषदेच्या होलेवस्ती येथील प्राथमिक शाळेत बदलून आले होते. अरविंद देवकर यांनी मागील गुरुवारी (दि. ३) शाळेतच विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. विषारी तणनाशक अंगात मोठ्या प्रमाणात भिनल्याने त्यांच्यावर सुरुवातीला उरुळी कांचन येथे उपचार करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून हडपसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर पाच दिवसांनी मंगळवारी (दि. ८) हडपसर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अरविंद देवकर यांची जून महिन्यात दौंड तालुक्यातील मिरवडीच्या शाळेतून जावजीबुवाचीवाडी ग्रामपंचायत हद्दीतील होलेवस्ती येथील जिल्हा परिषदेच्या एकशिक्षकी शाळेत बदली झाली होती. होलेवस्तीच्या शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग असले तरी या शाळेत अवघे

दहाच विद्यार्थी शिक्षण घेत होते. चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळा सुरू होताना शाळेची दुरावस्था पाहून अरविंद देवकर यांनी शाळेत शिक्षण घेणाऱ्या दहाही मुलांच्या मदतीने शाळा आणि परिसराची साफसफाई करून घेतली होती.

 ही बाब विद्यार्थ्यांनी घरी गेल्यावर पालकांना सांगितली. मुलांकडून शाळा आणि परिसराची स्वच्छता करून घेतल्याच्या कारणावरून चिडलेल्या दहाही मुलांच्या पालकांनी दुसऱ्या दिवशी शाळेत येऊन गोंधळ घातला. या गोंधळानंतर पुढील पाच ते सहा दिवसांच्या आतच शाळेतील दहापैकी नऊ मुलांच्या पालकांनी आपापल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या जावजीबुवाचीवाडी गावच्या हद्दीतील दुसऱ्या शाळेत हलविले.

दहापैकी नऊ विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने होलेवस्तीच्या शाळेत एकच विद्यार्थी उरला होता. त्यानेही दुसऱ्या दिवसापासून शाळेकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली. नातेवाईकांनी मात्र अरविंद देवकर यांच्या आत्महत्येच्या मागे शाळेतील विद्यार्थी शाळा सोडून गेल्याचे एकमेव कारण नसल्याचा दावा केला आहे. उरुळी कांचन व परिसरातील काही खासगी सावकार व त्यांचे 'बगलबच्चे' त्रास देत असल्याने अरविंद देवकर यांनी आत्महत्या केल्याचा दावा देवकर यांच्या नातेवाईकांनी केला.

अरविंद देवकर हे मागील १९ वर्षांपासून उपशिक्षक म्हणून दौंड तालुक्यात कार्यरत होते. खुपटेवस्ती येथील प्राथमिक शाळेत १२ वर्षे, तर मिरवडी येथील शाळेत ६ वर्षांहून अधिक काळ त्यांनी उपशिक्षक म्हणून काम केले. दोन महिन्यांपूर्वी  होलेवस्ती येथील शाळेत ते बदलून आले होते. 

साधी राहणी आणि मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांना आपलेसे वाटत. ते उत्कृष्ट शिक्षक म्हणून परिचित होते. दौंड पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी एस. डी. महाजन म्हणाले, ‘‘देवकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील कारणांबाबतची माहितीही मिळवली जात आहे. ही माहिती मिळताच अहवाल तयार करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवला जाणार आहे.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story