तुषार गांधींची भिडेंविरोधात पोलिसात तक्रार
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्याविरोधात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी गुरुवारी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याचबरोबर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत विविध संघटनांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. शहरातील २० हून अधिक पुरोगामी संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
तुषार गांधी यांच्या तक्रारीवर कायदेतज्ज्ञांचे मत घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
यावेळी बोलताना तुषार गांधी म्हणाले की, संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि त्यांच्या कुटुंबाच्या चारित्र्यावर हल्ला केला आहे. त्यामुळे आम्ही प्रचंड व्यथित झालो आहोत. गांधीवादी संघटनांसोबत मिळून आज आम्ही ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलीस जबाबदारीने कारवाई करतील, अशी आम्हाला आशा आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संभाजी भिडे आणि त्यांची संघटना तसेच अमरावतीतील ज्या कार्यक्रमात भिडेंनी महात्मा गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य केले, त्या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची आमची मागणी आहे.
पिंपरीत विविध संघटनांचा मोर्चा
संभाजी भिडे यांनी केलेलल्या वादग्रस्त विधानाचे पिंपरीत गुरुवारी पडसाद उमटून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत विविध संघटनांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. शहरातील २० हून अधिक पुरोगामी संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. तसेच गुन्हा दाखल करण्यास एवढा उशीर होण्याचे कारण काय असा सवाल यावेळी संघटनांनी उपस्थित केला. संभाजी भिडे काही दिवसांपूर्वी दिघी येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे "हांडगे स्वातंत्र्य" आहे; असले स्वातंत्र्य पुर्णत्वाला नेणारे स्वातंत्र्य नाही. त्यामुळे आपला स्वातंत्र्यदिन हा दुःखाचा दिवस आहे, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले होते. तिरंगी झेंड्याच्या जनानखान्यात गेली पन्नास वर्षे आमची स्वातंत्र्य लक्ष्मी हे कुत्र्याचे जगणे जगत आहे आणि हा मार्ग त्या बापूने दाखविला, अशा अपमानकारक शब्दांत भिडे यांनी तिरंगा झेंडा आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींचा उल्लेख केला होता. या विधानानंतर महाराष्ट्रासह देशात गदारोळ झाला होता. त्यावर शहरातील विविध सामाजिक संघटनांनी आक्षेप घेतला. धार्मिक भावना दुखावल्या, महामानवांचा अवमान केला, सामाजिक सलोखा भंग केल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे.
पोलिसांनी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी विविध संघटनांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. चिंचवड येथील दळवीनगर येथून हा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान पोलिसांनी सर्व आंदोलकांना दळवीनगर येथेच अडवले. तेथे सामाजिक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. शहरातील सर्व पोलीस ठाण्यातून अधिकारी, कर्मचारी बोलावले होते. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, "कायदेशीर बाबी पडताळून पाहिल्या जात आहेत. पुढील दोन ते तीन दिवसात त्या पूर्ण होतील. त्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल."