वैद्यकीय महाविद्यालयात तोडफोड; मनसेवर गुन्हा
नितीन गांगर्डे
पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता (डीन) आशिष श्रीनाथ बनगिनवार यांना एमबीबीएसच्या प्रवेशासाठी १६ लाख रुपयांच्या लाचेतील १० लाख रुपयाचा पहिला हप्ता घेताना लाचलुचपत विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले होते. यावर संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी येथील कार्यालयात जाऊन घोषणाबाजी करत तोडफोड केली. या प्रकरणी महाविद्यालयातील वरिष्ठ तांत्रिक मॅकेनिक भाऊसाहेब शंकरराव माने यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मनसेचे आशिष साबळे, प्रशांत कनोजिया, धनंजय गवळी यांच्यासह आणखी ६ ते ७ जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी भाऊसाहेब शंकरराव माने (वय ३७) हे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ या ठिकाणी वरिष्ठ तांत्रिक मॅकेनिक या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत आहे. फिर्यादी माने महाविद्यालयाच्या प्रशासकीय कार्यालयात काम करतात. बुधवारी (दि. ९ ऑगस्ट) फिर्यादी माने सकाळी नेहमीप्रमाणे कामावर आले होते. त्या वेळी कार्यालयात सर्व जण कामावर हजर होते. मंगळवारी महाविद्यालयाचे अधिष्ठाता अशिष बनगिनवार यांना लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली होती. त्या संदर्भात महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकारी आबाजी खाडे, विनोद इंगोले हे महानगरपालिका आयुक्त यांना भेटण्यासाठी महानगरपालिकेत गेले होते. ते जाण्यापूर्वी फिर्यादी माने यांनी संगणकावर पत्र तयार करून दिले होते. दुपारी १२ ते १ वाजताच्या दरम्यान कार्यालयातील सर्व जण काम करीत असताना अचानक ८ ते १० जणांचा घोळका महाविद्यालयात आला. त्यातील प्रत्येकाने केशरी रंगाची टोपी घातली होती. त्यांच्या गळ्यात केशरी रंगाचा शेला होता आणि त्यावर मनसे असे लिहिलेले होते. त्यांनी कार्यालयात गेल्यावर बनगिनवार यांच्या नावाच्या पाटीवर शाई फेकली. त्याच वेळी काहींनी कार्यालयातील खुर्च्या वर उचलून जमिनीवर आपटून तोडल्या. यातील काहींनी कार्यालयीन अधीक्षक अस्मिता कुलकर्णी, स्टेनो दर्शना फिरके, फोटोग्राफर नेहाल निकम यांच्या टेबलवर असलेले संगणक उचलून जमीनवर फेकले. त्यांची तोडफोड करून नुकसान केले. अस्मिता कुलकर्णी यांचा टेबल ढकलून उलटा केला आणि घोषणा देत तेथून निघून गेले.
महाविद्यालयाच्या कार्यालयातील तीन संगणक आणि दोन खुर्च्यांची तोडफोड करून त्यांनी एकूण ९० हजार रुपयांच्या सरकारी मालमत्तेचे नुकसान केले.