पिंपरी-चिंचवडमध्ये सीसीटीव्हीचे भिजत घोंगडे

स्मार्ट सिटी योजने अंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि राज्य सरकारतर्फे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीचा विषय अद्यापही थंड बस्त्यात असून वारंवार तक्रार करूनही शहरातील ७५ टक्के कॅमेऱ्यांना वायर जोडणी करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Fri, 11 Aug 2023
  • 11:57 am
पिंपरी-चिंचवडमध्ये सीसीटीव्हीचे भिजत घोंगडे

पिंपरी-चिंचवडमध्ये सीसीटीव्हीचे भिजत घोंगडे

पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद; थेट पोलीस आयुक्तांनी केली पाहणी

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

स्मार्ट सिटी योजने अंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि राज्य सरकारतर्फे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीचा विषय अद्यापही थंड बस्त्यात असून वारंवार तक्रार करूनही शहरातील ७५ टक्के कॅमेऱ्यांना वायर जोडणी करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. शहरातील गुन्हेगारीच्या घटनांत वाढ होऊनही पालिका प्रशासन याकडे गांभीर्याने बघण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. ही धक्कादायक बाब सात आठ महिन्यांपूर्वी समोर आली होती. आदित्य ओगले याच्या अपहरण-खून प्रकरणाच्या तपासात ही बाब प्रकर्षाने अधोरेखित झाली होती. तसेच अनेक कॅमेऱ्याचे फुटेज अंधुक असल्यानेही तपासात अडथळे निर्माण झाले होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलिसांना तपासात अडथळे येत आहेत. स्मार्ट सिटी योजनेत बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांना वायर जोडणी झाली नसल्याची धक्कादायक बाब सात आठ महिन्यांपूर्वीच समोर आली होती. आदित्य ओगले याच्या अपहरण-खून प्रकरणाच्या तपासात ही बाब प्रकर्षाने अधोरेखित झाली होती. तसेच अनेक कॅमेऱ्याचे फुटेज अंधुक असल्यानेही तपासात अडथळे निर्माण झाले होते. त्यानंतर तत्कालीन अधिकाऱ्यांनी महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना याबाबत त्वरित तोडगा काढण्याची सूचना केली होती. मात्र, आठ महिन्यांनी ही शहरातील ७५ टक्के कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह अति वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निगडी येथील सीसीटीव्ही कमांड कंट्रोल रूममध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी करीत येथील अधिकारी कर्मचारी यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत.

स्मार्ट सिटी आणि महापालिकेसह राज्य शासनाने लावलेले ७५ टक्के सीसीटीव्ही कॅमेरे पिंपरी-चिंचवडमध्ये बंद आहेत. शहराची अंतर्गत सुरक्षा आणि तपासात येत असलेल्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी आदींनी कमांड कंट्रोल रूमला भेट देत हे सीसीटीव्ही लवकर कार्यान्वित होण्यासाठी असलेल्या अडचणींबाबत चर्चा केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात २४०० तर स्मार्ट सिटी योजनेत हजारो कॅमेरे बसविले असून, निम्याहून अधिक कॅमेरे बंद आहेत. यापूर्वी महापालिका प्रशासक तथा स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शेखर सिंह यांनी कमांड कंट्रोल सेंटरला भेट देऊन आढावा घेतला होता. तर त्यापूर्वी स्मार्ट सिटी सल्लागार समितीच्या झालेल्या अनेक बैठकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले होते.  स्मार्ट सिटी कंपनीत महापालिका आयुक्त हे सीईओ तर पोलीस आयुक्त हे निमंत्रित संचालक असून, अनेक सल्लागारांचा यात समावेश करण्यात आला आहे. कमांड कंट्रोलचे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे. पोलीस एखाद्या घटनेची माहिती मिळविण्यासाठी कमांड कंट्रोलमध्ये गेल्यावर व्यवस्थित माहिती मिळत नसल्याच्या तक्रारी यापूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. शासन आणि स्मार्ट सिटी योजनेत बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांची स्थिती पाहता पोलीस खासगी पातळीवर सर्व झोपडपट्ट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story