प्रेमाला विरोध करताच महिलेची हत्या
पुण्यातील खडकी परिसरात चार दिवसांपूर्वी एका महिलेचा चाकू भोकसुन खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा शोध खडकी पोलीस घेत असताना चार दिवसानंतर यातील आरोपीला कर्नाटक येथील विजापूर येथून अटक करण्यात आले आहे. नासिर बिराजदार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
यामध्ये मयत महिलेचे नाव रजनी बेकुल्ले असे होते. रजनी या आपल्या पतीच्या जागी अनुकंप तत्वावर खडकी येथे काम करत होत्या. काही वेळा रजनी आपल्या दुचाकीवरून नोकरीसाठी जात असत. एका अपघातानंतर त्या रोज नोकरीवर येण्या जाण्यासाठी रिक्षाचा वापर करत होत्या. गेले आठ वर्षांपासून रजनी रिक्षाने प्रवास करत होत्या. या दरम्यान रिक्षा चालक व त्यांची ओळख झाली. या ओळखीनंतर आरोपीने रजनी यांच्यावर प्रेम असल्याचे सांगितले.
पण रजनी यांनी या प्रेमाला विरोध केला. नासिर बिराजदार याला हा विरोध मान्य नसल्याने त्याने आपल्या साथीदाराच्या सहाय्याने रजनी हिचा चाकू भोसकून खून केला. खून केल्यानंतर आरोपी कर्नाटक येथे फरार झाला होता. खडकी पोलीस याबाबतचा तपास करत होते. या तपासामध्ये त्यांनी आरोपीला कर्नाटक येथील विजापूर येथून ताब्यात घेतले असून त्याच्या साथीदारांचा शोध खडकी पोलीस करत आहेत.