शहर हद्दीतील गावात ७५ वर्षांनंतर बस...

पुण्याच्या अगदी सीमेवर असलेले कोळेवाडी गाव. चहूबाजूंनी सह्याद्रीच्या रांगानी वेढलेल्या गावात घनदाट झाडीच्या सावलीत बागडणारी पाखरे, पशु-पक्ष्यांसमवेत राहणारे ग्रामस्थ. कोळेवाडी गाव नैसर्गिक सौंदर्याची खाण असले तरी ते भौतिक विकासापासून वंचित राहिले. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांच्या इतिहासात या गावात एकदाही बस आली नाही आणि त्यासाठी म्हणावे तसे प्रयत्नही केले गेले नाहीत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 22 Mar 2023
  • 10:23 am
शहर हद्दीतील गावात  ७५ वर्षांनंतर बस...

शहर हद्दीतील गावात ७५ वर्षांनंतर बस...

सततच्या पाठपुराव्याला यश, कोळेवाडीत जाण्यास रस्त्याअभावी एसटी, पीएमपीने दिला होता नकार

महेंद्र कोल्हे  

 mahendra.kolhe@civicmirror.in

TWEET@mahendrakolhe30

पुण्याच्या अगदी सीमेवर असलेले कोळेवाडी गाव.  चहूबाजूंनी सह्याद्रीच्या रांगानी वेढलेल्या गावात घनदाट झाडीच्या सावलीत बागडणारी पाखरे, पशु-पक्ष्यांसमवेत राहणारे ग्रामस्थ. कोळेवाडी गाव नैसर्गिक सौंदर्याची खाण असले तरी ते भौतिक विकासापासून वंचित राहिले.  स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांच्या इतिहासात या गावात एकदाही बस आली नाही आणि त्यासाठी म्हणावे तसे प्रयत्नही केले गेले नाहीत. मुळात रस्ता नसल्याने एसटी नाही आणि एसटी नसल्याने विकास नाही. पालिकेच्या हद्दीबाहेरील १०० किलोमीटर गावांना  पीएमपीएमएल मिळत असताना येथे मात्र ही सुविधा द्यावी असे कुणालाच वाटले नाही. परिणामी विद्यार्थी, नोकरदार आणि महिलांना तब्बल चार किलोमीटरची पायपीट करावी लागायची. गाव तेथे एसटी आणि रस्ता तेथे एसटी असं ब्रीद घेऊन महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यापासून ते गाव-वस्त्यापर्यंत एसटी पोहचली, मात्र एसटीची चाके पुण्याच्या वेशीवरील कोळेवाडी गावात पोहोचली नव्हती. 

साधारण दोन वर्षांपूर्वी हे गाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाले खरे; पण सुविधा मात्र काहीच नाही. अखेर दोन वर्षे केलेल्या मिनतवाऱ्या आणि अर्ज-विनंत्या कामी आल्या आणि गुडीपाडव्याच्या पूर्वसंध्येला गावात पहिली पीएमपीची बस दाखल झाली. तिच्या येण्याने गावात आनंदाचे उधाण आले. तिला बघण्यासाठी गाव जमला, हारतुरे, पूजा करून तिचं स्वागत केलं. संपूर्ण गाव हर्ष-आनंदात न्हाऊन निघालं. उर्वरित आंबेगाव खुर्द सोबत

महापालिकेत सहभागी झालेल्या दुर्गम कोळेवाडीला हा पहिलाच पीएमपीचा स्पर्श होता. आजवर बस न पोहचलेल्या महापालिकेतील गावात सोमवारपासून बससेवा सुरू झाली. 

कोळेवाडी गाव दक्षिण उपनगरामधील महापालिकेचे शेवटचे टोक, सुमारे पाचशे-सहाशे लोकसंख्या असलेले हे गाव सुरुवातीला आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी, कोळेवाडी या ग्रुप ग्रामपंचायत होते. 

आंबेगाव खुर्द महापालिकेत अंशतः समाविष्ट झाल्यानंतर ग्रामपंचायती स्वतंत्र झाल्या, या गावात अद्यापही मूलभूत सुविधा पोहचल्या नाहीत. अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटली. मात्र, गावात बससेवा पोहोचली नव्हती.

जनहित विकास मंचचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुधीर कोंढरे म्हणाले, "गावकऱ्यांच्या गरजा लक्षात घेत गावात बससेवा सुरू करण्याची मागणी पीएमपीएलकडे  सतत पाच वर्षे लावून धरली, कोळेवाडी भागात आदिवासी समाज तसेच कोळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे, इथल्या नागरिकांना प्रवासासाठी कुठलेही साधन उपलब्ध नाही. पीएमपी तर दूरच पण एसटी बसही कधी आल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना तीन-चार किलोमीटर पायपीट करून प्रवास करावा लागायचा, लहान मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे  लागत होते. गावकऱ्यांना तब्बल तीन किमी पायी प्रवास करून जांभूळवाडी गाठावे लागत असे. महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. पीएमपीएलला पत्र दिले होते. दरम्यान कोळेवाडी गावातील प्रवाशांचा विचार करून अखेर पीएमपीएलने हिरवा कंदील दिला अन् पहिल्यांदाच बससेवा गावात सुरू झाली. बसच्या स्वागतासाठी गाव एकवटला. गावकऱ्यांनी बसला हार घालून सजवलं, महिलांनी आरती ओवाळली अन् वाहक, चालकाचे शाल-श्रीफळ देऊन स्वागत केले." असे कोंढरे म्हणाले. 

राम पांढरे स्थानिक नागरिक म्हणाले, "स्थानिक नागरिकांच्या खूप दिवसांच्या मागणीला यश आले.  प्रवासाची कुठलीही सोय नसल्यामुळे इथल्या नागरिकांना गेली अनेक वर्षे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. विशेषत: विद्यार्थीवर्ग आणि महिलांना तर खूप त्रास होत होता.  काही मुलींनी तर शाळेत जाणेही बंद केले होते पण आता बसच्या रोज चार फेऱ्या चालू करून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे."

आदिवासीपाडा कोळेवाडी युवक समिती कोळेवाडी यांच्या मते, त्यांनी दोन वर्षांपूर्वी कात्रज आगारात बस सुरू व्हावी म्हणून अर्ज केला होता. त्यावर योग्य कार्यवाही झाली नाही. आता बससेवा सुरू झाली तर गावातील शैक्षणिकपटात वाढ होईल. विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठांना याचा फायदा होईल. पावसाळ्यात गावकऱ्यांची दळणवळणाची सोय होईल.

सीविक मिररशी बोलताना पीएमपीचे  कात्रज आगार प्रमुख गोविंद हांडे म्हणाले, "कोळेवाडी ग्रामसंस्थेची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. जांभूळवाडी संपल्यावर थोड्याच अंतरावर मोठे चढण आणि रस्त्याची समस्या होती, रस्ता वाहतुकीस योग्य झाला. त्यानुसार आम्ही पाहणी करून चाचणी घेऊन येथे बससेवा सुरू केली आहे. आता रोजच्या चार फेऱ्या इथे होतात."

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story