भीमाशंकर ज्योतिर्लिंग आता आसाम पळवणार ?
सीविक मिरर ब्यूरो
आसामचे भाजपचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी सहावं ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याची जाहिरात दिली आहे. मात्र, देशातील सहावं ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे असल्याचे मानले जाते. आसामने आता थेट भीसाशंकरवर दावा केल्याने राज्यात नव्या वादाला सुरूवात झाली आहे.
देशात भगवान शंकराची १२ ज्योतिर्लिंग मंदिरे असून त्यातील तीन महाराष्ट्रात आहेत. त्यातील सहावे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. ते आता गुवाहाटीतील कामाख्या देवी असल्याचा दावा केल्याने भीमाशंकरच्या बचावासाठी राजकीय पक्षांनी मैदानात उतरले आहेत. उद्योग पळवण्यापाठोपाठ आता राज्याचे अाध्यात्मिक क्षेत्र पळवले जात आहे का, अशी चर्चा रंगली आहे.
काय आहे जाहिरात?
आसामचे भाजपचे मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा सरमा यांनी १४ फेब्रुवारीच्या जाहिरातीमध्ये महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या जाहिरातीमध्ये त्यांनी आसाममधील डाकिनी टेकडीच्या कुशीत वसलेले पामोही येथील शिवलिंग हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केला आहे. पर्यटन विभागाने जाहिरातीत आमचे ज्योतिर्लिंग खरे असल्याचा दावा केला आहे.
ज्योतिर्लिंगाच्या या वादावरून राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 'भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळविले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय....!', असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये सुप्रिया सुळे यांनी या जाहिरातीचा फोटोही शेअर केला आहे.
भीमाशंकर गुवाहाटीला दान
“श्री शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातील ‘भीमाशंकर’ जि. पुणे, हे ज्योतिर्लिंग ओळखले जाते. भाजपाची सत्ता असणाऱ्या आसाम राज्याने गुवाहाटीजवळ असणारे पामोही येथील शिवलिंग सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा प्रचार सुरू केला आहे. घटनाबाह्य ईडी सरकारने गुवाहाटीला आमदारांची फौज पळवून नेली होती. तिथं तुमची सर्व सोय अदृश्य शक्तीच्यावतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचवेळी तुम्ही बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना? अर्थात अशी शक्यता नाकारता येत नाही”, असं खरमरीत ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
गुवाहाटीत असताना ४० आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी तेथील कामाख्या देवीची पूजा केली होती. सत्तेवर आल्यानंतर ते कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. त्याचा संदर्भ देत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे ट्विटमध्ये म्हणतात की, त्यामुळे आता कामाख्या देवी महाराष्ट्रात आहे असे आम्ही का सांगू नये. आसाम महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेच्या श्रद्धेवर घाला घालत आहे. आधी राज्यातील उद्योग पळवल्याचे पाहिलं होते. आता महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानावर घाला घालण्याचा प्रकार प्रथमच पाहत आहे. भीमाशंकर श्रद्धेचे स्थान असल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आसामला ठणकावून सांगण्याची गरज आहे. आता पौराणिक कथांतील स्थळांची पळपळवी होऊ लागली आहे.
सर्व पुराणात भीमाशंकर
दरम्यान भीमाशंकर हेच धर्मशास्त्रांत उल्लेख केलेले सहावे ज्योतिर्लिंग असल्याने याविषयी राजकीय वाद नको अशी भूमिका महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतली आहे. आद्य शंकराचार्य यांच्या बारा ज्योतिर्लिंग श्लोक, तसेच शिवलिलामृत ग्रंथ, शिवपुराण आदी अनेक मान्यताप्राप्त धर्मग्रंथांमध्ये पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर हेच सहावे भगवान शिवाचे स्वयंभू ज्योतिर्लिंग असल्याचे स्पष्ट आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये भीमा नदीचे उगमस्थान असलेल्या घनदाट जंगलातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वसलेले श्री भीमाशंकर हेच अत्यंत प्राचीन आणि सहावे ज्योतिर्लिंग देवस्थान आहे, असे ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी स्पष्ट केले आहे.
या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंकराचार्य-धर्माचार्य यांचे मार्गदर्शन घेऊन पुणे जिल्ह्यातील श्री भीमाशंकर हेच सहावे ज्योतिर्लिंग असल्याची ठाम भूमिका देशासमोर मांडावी, असे आवाहन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघाने केले आहे.
खेड तालुक्यात असलेले भीमाशंकर मंदिर बाराव्या ज्योतिर्लिंगात सहाव्या क्रमांकावर आहे. धार्मिक मान्यतेनुसार, त्रेतायुगात शिव आणि दैत्य त्रिपुरासूर यांच्यातील युद्धात इतकी उष्णता निर्माण झाली की, भीमा नदी कोरडी पडली. त्यानंतर शंकरजींच्या घामाने ही नदी पुन्हा भरली, असं म्हटलं जातं.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.